उदय टिकेकर
माझ्या आजोबांच्या पिढीपासून आमच्याकडे दरवर्षी न चुकता बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. कर्नाटकातील  जमखंडी येथून आमच्याकडे बाप्पाची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा सुरु झाली. आता माझ्या चुलत भावाकडे गणपती आणला जातो. माझा भाऊदेखील गिरगावातचं राहतो. त्यामुळे आम्ही सर्वजण आरतीसाठी त्याच्या घरी जमतो. घरची सर्वमंडळी बाप्पाची साग्रसंगीत पूजा करतात. बाप्पाच्या सजावटीत कोणताही थाटमाट न करता अगदी साध्या पद्धतीने आरास केली जाते. घरात ज्या वस्तू असतील त्यांचा सजावटीसाठी उपयोग केला जातो.
पूर्वी आमच्याकडे पीओपीची मूर्ती आणली जायची. पण पर्यावरणाची होणारी हानी पाहता मीच भावाला म्हटलं की आपण गणपतीची पंचधातूची मूर्ती बनवून घेऊ. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही पंचधातूपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करतोय. आमच्याकडे सात दिवसांचे गौरी-गणपती असतात. मग विसर्जनादिवशी घराबाहेरच कृत्रिम विसर्जन तळ्यात त्या मूर्तीचे विसर्जन करतो. त्यानंतर बाप्पाची ही मूर्ती व्यवस्थित पुसून पुन्हा देवा-यात ठेवली जातो. प्रथेनुसार प्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीला हलवले की त्याचे विसर्जन झाले असे म्हणतात.
आजकाल आपण बाप्पाच्या विविध स्वरुपातल्या मूर्ती पाहतो. हल्ली जे काही चाललेल आहे त्याचं हे प्रतिक आहे. गणपती हा कलेचा देवता आहे. त्यामुळे मल्हार, बाजीराव किंवा आणखी काही स्वपरुपातील मूर्ती तयार करणे मला अयोग्य वाटत नाही. उलट आंदोलनाला बसलेला बाप्पा किंवा शेतक-यांचे समर्थन करणारा बाप्पा ही स्वरुप सामाजिक जनजागृती घडवून आणणारी आहेत. पण केवळ स्पर्धेपोटी उभी केलेली मंडळ आणि बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीत होणारी वाढ हे मला चुकीचं वाटतं. गल्लोगल्ली गणपती मंडळांची स्थापना न करता एक विभाग एक गणपती अशी संकल्पना अंमलात आणायला हवी. त्यामुळे लोकांना या सणाच्या निमित्ताने एकत्र आणण्याचा टिळकांचा हेतू साध्य होईल. त्याचसोबत मोठ्या प्रमाणात पैसे वाचतील आणि ते पैसे समाजसेवेसाठी वापरले तर ते अधिक चागंल होईल.