नेहा जोशी

मी मूळची नाशिकची आहे. आमच्याकडे नाशिकला दीड दिवसाचा गणपती येतो. जरी दीड दिवसाचा गणपती असला तरी महिन्याभरापूर्वी गणपतीच्या सजावटीची तयारी सुरु होते. माझ्या बाबांना याचं खूप वेड आहे. माझ्या घरी सर्वांची देवावर श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही. तसं बघायला गेलं तर आम्ही सगळे वेगवेगळं राहतो. मात्र, एखादा सण असला की त्यावेळी सर्वजण एकत्र जमतात. तशी प्रथा माझ्या आजीनेच घालून दिली आहे. आमच्या आजीने जेव्हा सत्तरी ओलांडली तेव्हा तिने सर्वांना समोर बसवलं. तिच्या सर्व मुलांना तिने चक्क सण वाटून दिले. आमच्याकडे गणपती, देवीची नवरात्र आणि खंडबोची नवरात्र हे तीन सण प्रामुख्याने साजरे केले जातात आणि हे तिनही सण तिने आपल्या मुलांमध्ये वाटून दिले. त्यादरम्यान प्रत्येक सणाला ज्याच्या घरी तो सण असेल तेव्हा तिथे सर्वांनी एकत्र जमायचं आणि सण साजरा करायचा. यामागची आजीची एकच धारणा होती की सर्व कुटुंब त्यानिमित्ताने एकत्र राहिल. विशेष म्हणजे संपूर्ण जोशी कुटुंबात एकच गणपती बसला पाहिजे असं तिचं म्हणणं होतं. देवावरील श्रद्धेचा कुटुंब एकत्र राहण्यासाठी तिने एक चांगला उपयोग केला. हे किती कौतुकास्पद आहे.
गणपतीचे आगमन होण्यापूर्वी सजावटीचा मोठा थाट घातला जातो. दरवर्षी वेगळी आरास केली जात असून शक्यतो त्यासाठी पर्यावरणस्नेही सामान वापरण्याचा आमचा प्रयत्न असतो. माझे बाबा यात प्रमुख असतात आणि त्यांच्या हाताखाली आम्ही ते सांगतील तसं काम करत जातो. एक वर्ष बाबांनी पुठ्ठ्यापासून सुंदर वाडा तयार केला होता. माझी एक वहिनी डॉक्टर आहे. ती स्वत: गेली तीन वर्ष शाडूच्या मातीपासून बाप्पाची मूर्ती तयार करतेय. माझी काकू पौरोहित्य करणारी असल्याने तीच पूजा सांगते. त्यानंतर घरातील सर्व स्त्रिया मिळून नैवेद्याचं जेवण तयार करतो. यावेळी घरातलीच जवळपास २० मंडळी असतात.  त्यामुळे सात ते आठ नारळांचे उखडीचे मोदक, विविध भाज्या असं पारंपारिक जेवण नैवेद्यासाठी केलं जातं. माझं कुटुंब पुरोगामी विचारांच आहे. पुरुषांनी प्राणप्रतिष्ठापना करण्याची परंपरा पूर्वीपासून आपल्याकडे आहे. पण आमच्याकडे मुलींनाही प्रतिष्ठापना करण्यास देतात. त्यामुळे मला आणि माझ्या बहिणीला बाप्पाची प्रतिष्ठापना करण्याची संधी मिळाली. आमच्याकडे ठराविक अशी बाप्पाची मूर्ती आणत नाही. दरवर्षी वेगळ्या रुपातील बाप्पा आमच्या घरी विराजमान होतात. आमच्याकडे गोट्यांची गौरी आणली जाते. गौरीला ब्राम्हणांचा पारंपारिक घावण घाटल्याचा नैवेद्य दाखविला जातो.
मला वाटतं या जगात एक शक्ती आहे. देव ही आपण तयार केलेली संकल्पना आहे. आपण देवाला पाहिलेलं नाही, त्याची रुपं आपण निर्माण केलेली आहेत. पण एक अद्भूत शक्ती आहे यावर माझा विश्वास आहे. कारण छोट्या बीपासून रोपटं उगवण्यापर्यंत अशा अनेक चमत्कारिक गोष्टी होताना आपण बघतो. मात्र, आता काही वेगळं वातावरण पाहायला मिळतं. प्रत्येक सणाचा इवेन्ट बनवून मोठमोठ्या सेलिब्रेटींना बोलावलं जातं. याच्यामध्ये भरपूर पैसा खर्च होतो. आपल्याकडे इतकी मोठी आर्थिक दरी आहे की खरंच एवढा पैसा खर्च करण्याची गरज आहे का? त्यापेक्षा तो पैसा चांगल्या कामी आणि ज्यांना त्याची गरज आहे त्यांच्यासाठी उपयोगी आणायला हवा. तेव्हा आपण देवासाठी काहीतरी करतोय असे वाटेल. गणपती सोन्या चांदीचा भूकेला नाहीये. तुम्ही बाप्पाला साधं पितांबर नेसवलं त्याला साधी गोंड्याची माळ घातली तरी त्याचं रुप खुलूनचं येणार. उगाचचं सणाच्या नावाखाली गाजावाजा करणं हे खूप अनाठायी आहे.

शब्दांकन- चैताली गुरव