News Flash

Sonali Kulkarni:’माझा बाप्पा माझ्यासारखा एकटा होता’

शेवटच्या दिवशी आमच्याकडे अनंताची पूजा केली जाते.

Sonali Kulkarni

सोनाली कुलकर्णी

गेल्या अनेक वर्षांपासून आमच्याकडे बाप्पा विराजमान होत आहेत. माझ्या माहेरी म्हणजेच पुण्याच्या घरी गणपती असायचा. त्यानंतर आता माझ्या मोठ्या भावाच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. शेवटच्या दिवशी आमच्याकडे अनंताची पूजा केली जाते. मी न चुकता या पूजेला उपस्थित राहायचे. पण आता लग्नानंतर नचिकेतच्या म्हणजे माझ्या नव-याच्या घरी श्रीरामपूरला अनंताच्या पूजेला जातो. तिथे नचिकेतची आत्या ही पूजा करते. या पूजेत विष्णूची पूजा केली जाते. प्रत्येक घराण्यात ही पिढीजात प्रथा असते. नचिकेतच्या आत्या पंथवैद्य आहेत. त्याच ही पूजा करतात. शेषनागाला फुलांनी सजवून त्याची पूजा केली जाते.
लग्नापूर्वी मी गेली अनेक वर्ष मुंबईत एकटी राहत होते. तेव्हा मी बाप्पाची पर्यावरणस्नेही एक छोटीशी सुंदर मूर्ती आणली होती. त्यावेळी माझा बाप्पा माझ्यासारखाच एकटा होता. मला आणि नचिकेतला ती मूर्ती खूप आवडते. आम्ही गेल्या काही वर्षांपासून माझ्या जुन्या घरून ती मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करतो. पण मी या मूर्तीचे विसर्जन करत नाही. आमचे दोघांचेही विचार फार मिळते जुळते आहेत. आम्हा दोघांचीही बाप्पाचे विसर्जन करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे गणेशोत्सव झाल्यानंतर ती मूर्ती मी पुन्हा जुन्या घरी नेऊन ठेवते. बाप्पासाठी आम्ही छानशी सजावट करतो. मला थर्माकॉलची सजावट आवडते. पण गेल्या दोन वर्षात मी थोडी वेगळी सजावट केली. माझ्या घरात खूप कुंड्या आहेत. त्यामुळे बाप्पाच्या मूर्तीच्या बाजूने आम्ही कुंड्याची रचना केली होती. त्यानंतर एक वर्ष खूप सा-या दिव्यांची आरास करण्यात आली होती. आमच्याकडे बरीच पुस्तकं आहेत. बाप्पाच्या निमित्ताने सर्वांशी भेटीगाठी होतात. पण मला वाटतं यादरम्यान त्याव्यतिरीक्त विचारांची देवाणघेवाण होणही गरजेचं आहे. यामुळेच मी कावेरीच्या शाळेतील मुलांना बोलावते. त्यावेळी ब-याच गप्पा होतात. तिच्या शाळेतली अनेक मुलं अमराठी असल्याने त्यांना गणपतीची माहिती मिळते. गेल्या वर्षीचा गणेशोत्सव माझ्या चांगलाच लक्षात राहण्यासारखा आहे. माझे संपूर्ण कुटुंब गेल्यावर्षी माझ्या घरी आलं होतं. कावेरीच्या शाळेतली ३०-४० मुलं घरी आली होती. तेव्हा निळू फुलेंची मुलगी गार्गी फुले हिने मला बाप्पाच्या छोट्या मूर्ती तयार करून दिल्या होत्या. या पर्यावरणस्नेही मूर्ती मी प्रत्येकाला दिलेल्या. याव्यतिरीक्त माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने काहीनाकाही सादरीकरण केलं होतं. माझा भाचा आठ वर्षांचा आहे त्याने आणि माझ्या आत्याने गाणं म्हटलं होतं. सास-यांनी बासरी वाजवली होती तर मी भरतनाट्यमच पद सादर केलं होत. आम्हाला तिघांनाही वाचनाची बरीच आवड आहे. त्यामुळे यंदा आम्ही पुस्तकांपासून घर बनवण्याचा विचार केला आहे.

शब्दांकन- चैताली गुरव

Next Stories
1 ‘बाप्पा सोन्या चांदीचा भुकेला नाही’
2 उरणमधील घरगुती गणेशोत्सवातूनही सामाजिक संदेश
3 ‘मी देवापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवतो’
Just Now!
X