27 February 2021

News Flash

‘माझ्यासाठी बाप्पा म्हणजे माझा मेहुणाच’

मोदक खाताना मात्र तिचं लक्ष त्याच्यावरच असतं

माझ्या गावी राजापूरला गणपती यायचा. मग काही कारणास्तव आम्ही तो मुंबईमध्ये आमच्या मूळ घरी जोगेश्वरीला आणला. यावर्षी घरातला मोठा मुलगा म्हणून मी माझ्या कांदिवलीच्या घरी गणपती आणला आहे. आमच्याकडे गौरी गणपती असतात. पहिले दोन दिवस आणि विसर्जनाच्या दिवशी मी ठरवून घरी असतो. पण यावर्षी मात्र पुणे महोत्सवाला जावे लागले त्यामुळे यावर्षी पहिल्यांदा मी विसर्जनासाठी घरी नव्हतो.
मला स्वतःला कोणताही बंदिस्तपणा आवडत नाही. जर मला आवडत नाही तर मी माझ्या बाप्पाला तरी सजावटीच्या नावाखाली का अडकवू. फुलांची आरास असलेली सजावट मला जास्त भावते. आधी चाळीमध्ये राहायचो तेव्हा लालबाग परळवरुन सहज कोणत्याही गोष्टी आणता यायच्या किंवा मित्रही मदतीला असायचे. पण या फ्लॅट संस्कृतीमध्ये मात्र तसं होत नाही. त्या जुन्या मजेची कमतरता नेहमीच जाणवते. आता सततच्या शुटिंगमुळे सजावट वैगेरे करायला मला पुरेसा वेळही मिळत नाहीत. घरातल्यांवर किती भार टाकणार. मी घराची सजावटच मुळात अशा पद्धतीने केली आहे की कोणताही सण उत्सव असला तरी वेगळ्या प्रकारच्या लाइट्स लावायची गरज लागणार नाही. संपूर्ण घराला मी पांढरा रंग दिला आहे आणि लाइट्समध्येही सौम्य रंगांचा वापर केला आहे. त्यामुळे अतिरिक्त भडक लाइट्समध्ये बाप्पाला ठेवायला मला अजिबात आवडत नाही.
माझ्यासाठी बाप्पा म्हणजे माझा मेहुणाच आहे. माझी बायको गणपतीला राखी बांधायची त्यामुळे त्याचं आणि माझं घरचं नातं आहे. शिवाय गणराय ही कलेची देवता आहे. त्याचे नाव घेतल्याशिवाय कोणतेच काम आपण करत नाही. मला गणेशोत्सव अजून एका कारणासाठी आवडतो तो म्हणजे उकडीचे मोदक. मी मुळात खवय्या आहे. माझी आई आणि बायको अप्रतिम उकडीचे मोदक बनवतात. आई मुलाच्या मायेने दोन मोदक अधिक देते तर तब्येतीवर लक्ष ठेवणारी बायको एखादा मोदक जास्त घेतला तर लगेच डोळे मोठे करते. घरातल्यांसोबतचे हे आंबट गोड क्षण शुटिंगच्या दिवसात मी मिस करतो. बाप्पा घरी आल्यानंतर मात्र मी ते दुपटीने जगतो.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 1:53 pm

Web Title: ganesh festival celebration by marathi actor atul todankar
Next Stories
1 राजेंद्र-स्मिता बनले ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉण्टेड’
2 ‘कॉम्प्लिकेटेड रिलेशनशीप’मध्ये असल्याची प्रियांकाची कबुली
3 ‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’साठी धोनीला मिळाले ४० कोटी?
Just Now!
X