सर्व कलांचा अधिनायक किंवा स्फूर्तिदेवता म्हणून कोणत्याही कला प्रकाराची सुरुवात गणपती पूजनाने किंवा गणेश वंदनेने करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. नाटकाआधी ‘नांदी’, तमाशातील ‘गण’ आणि दशावतारातील ‘नमन’ झाल्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात होते. त्यामुळे लोककला आणि लोकसंगीतातही आपल्याला ‘गणपती बाप्पा’ पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील जागरण, गोंधळ, भारूड, दशावतार, लळीत, कलगीतुरा, पोवाडा, तमाशा, लावणी, खडी गंमत अशा विविध लोककला प्रकारांत आणि लोकसंगीतांत गणेशस्तुती आणि गणेशवर्णन करण्यात आलेले आहे. हदगा किंवा भोंडला यामध्येही गणपतीची गाणी आहेत. ‘ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा’ अशी विनवणी गणपतीला करण्यात आली आहे.

शाहीर पठ्ठे बापुराव यांनी ‘आधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो!’ असे म्हटले आहे. कोणत्याही कलेमध्ये ‘चौदा विद्या आणि चौसष्ट कला’ यांचा अधिपती असलेल्या गणपतीचे महत्त्व पठ्ठे बापुराव यांनी अधोरेखित केले आहे. याच पठ्ठे बापुरावांनी ‘लवकर यावे सिद्ध गणेशा आतमधी कीर्तन वरून तमाशा, माझा भरवसा तुम्हावर खासा, विघ्न पिटविशी दाही दिशा’ अशी प्रार्थनाही गणपतीला केली आहे.
शाहीर हैबती घाटगे यांनी ‘श्री गजानन गणपती मंगलमूर्ती, द्यावी मज मती समारंभाला हो’ असे म्हटले आहे. तर काही गणांमध्ये ‘हे गणनायक सिद्धिविनायक वंदन पहिले तुला गणेशा, रसिकजनांनी भरले अंगण व्हावे मनाच्या त्यांच्या रंजना, लवकर यावे, दर्शन द्यावे घ्यावे जवळी एकच आशा’ असे म्हटले आहे. ‘थापाडय़ा’ या चित्रपटातील ‘हे शिवशंकर गिरिजा तनया गणनायका प्रभुवरा, शुभकार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा’ हे रामदास कामत यांनी गायलेले गाणे लोकप्रिय आहे. याचे शब्द मा. दा. देवकाते यांचे असून संगीत बाळ पळसुले यांचे आहे.
संगीत नाटकातील नांदीतही गणपतीची आराधना केलेली दिसून येते. ‘संगीत शाकुंतल’ या नाटकातील ‘पंचतुंड नररुंडमाळधर पार्वतीश आधी नमितो, विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपती मग तो’ ही नांदी आजही लोकप्रिय आहे. बाळ कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ नाटकात ‘गजाननाला वंदन करुनी, सरस्वतीचे स्तवन करोनी, मंगल शिवपद मनी स्मरोनी, सद्भावाने मुदित मनाने, अष्टांगाची करुनी ओंजळ, वाहतो ही दुर्वाची जुडी’ अशी प्रार्थना करण्यात आली आहे.
शाहिरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या पहाडी आवाजात पोवाडे गाऊन देशवासीयांमध्ये वीरश्री आणि देशभक्ती जागृत करण्याचे मोठे काम केले. वीरश्रीयुक्त पोवाडे आणि शृंगारिक लावण्या लिहिणाऱ्या शाहिरांनी कलांचा नायक असलेल्या गणपतीवरही काही रचना केल्या आहेत. गणपती हा प्रत्येकाला आपल्या जवळचा वाटतो.
शाहीर राम जोशी यांनी ‘महाराज गौरीनंदना, अमरवंदना, दैत्यकंदना हे मंगलमूर्ती ठेवी कृपादृष्टी एकदंत दीनावर पूरती’ असे वर्णन केले आहे. तर शाहीर प्रभाकर यांनी ‘गौरीसुता लंबोदरा ये, सिंदूर मर्दन विघ्नहरा ये, मती दे गजानना परशुधरा ये, गीत प्रसंगी रे करी आज सिद्धी गातो, आधी तुला विघ्नहरा ये’ अशा शब्दांत गणेशस्तुती केली आहे. शाहीर होनाजी बाळा यांनीही ‘गजवदन बहुत गोजिरे, मस्तकी बरे दुर्वाकुर तुरे, चतुष्करी चित्रविचित्रे मूषकध्वज, लंबोदरा सिंदूरध्यान जे जपती मंत्रे, भजियेला एकदंत सिद्धिविनायक, तो सुखदायक हे गुणनायक हृदयी धरती’ असे म्हटले आहे.
शाहीर, कवी, गीतकार आणि सर्व लोककला कलावंतांनीही आपापल्या परीने गणेशाची आराधना केली आहे. सहज व सोपे शब्द आणि पायाचा ठेका धरायला लावेल अशी चाल यामुळे लोककला आणि लोकसंगीतामधील ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
Strange accident happened due to brake failure driver arrested
नागपूर : ब्रेक निकामी झाल्यामुळेच घडला ‘तो’ विचित्र अपघात, चालकास अटक
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…