19 February 2019

News Flash

Ganesh Utsav 2018 : ‘असेल पाठीशी बाप्पाचा आधार, सुखाचा होईल प्रत्येक संसार’

विघ्नहर्त्याचा घेता आशीर्वाद, सुखी संसाराचं स्वप्न होईल साकार..

गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. विघ्नहर्त्याचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जात आहे. यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी कलर्स मराठी वाहिनीच्या संपूर्ण परिवाराने जय्यत तयारी केली आहे. वाहिनीवरील कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी, अनुभव वाचकांसोबत शेअर केले आहेत.

बाप्पाच्या आठवणीबद्दल बोलताना ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमधील प्रेम देशमुख म्हणजेच सचित पाटील म्हणाला, ‘बाप्पाच्या असंख्य आठवणी आहेत. लहानपणापासूनच्या किती सांगू आणि किती नाही असं होतं. माझ्या आजीकडे गणपती बाप्पा येतो… आम्ही सगळी भावंडं मिळून बाप्पाच्या आगमनाची वाट अगदी आतुरतेने बघत असे… टाळ मृदुंगाच्या साथीने ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करत बाप्पाला घरी घेऊन यायचो. यानिमित्ताने सगळ कुटुंब एकत्र यायचं जसं अजुनही येतं. जसे लहान असताना आम्हाला उकडीचे मोदक आवडायचे अगदी तसेच आजही आम्हाला प्रचंड आवडतात. दादरमध्ये गणपतीच्या दिवसांमध्ये खूप चैतन्यमय वातावरण असते. त्यादिवसांचीच एक आठवण सांगायची म्हणजे दादर मध्ये जेवढे सार्वजनिक गणपती आहेत तिथे आमच्या लहानपणी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे आणि आमची आजी आम्हाला तिथे घेऊन जायची. मला असं वाटत या क्षेत्रात येण्याची बीजं कुठेतरी तिकडे रोवली गेली. एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे पर्यावरणाचा विचार आपण सगळ्यांनी करणे खूप महत्वाचे आहे. इकोफ्रेंडली अशी गणेशाची मूर्ती घरोघरी आणली जाते जी अत्यंत चांगली गोष्ट आहे. या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये आपण पर्यावरणाचा तोल जाऊ देता कामा नये.

‘नवरा असावा तर असा’ या कार्यक्रमकाच्या सूत्रसंचालनाची धुरा ज्यांनी सांभाळली आहे अश्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या हर्षदा खानविलकर यांनी देखील त्यांच्या आणि बाप्पामधल्या अनोख्या नात्याचे काही किस्से आणि आठवणी सांगितल्या. ‘माझं आणि बाप्पाचं खूप खास नातं आहे असं मी समजते. मला असं वाटत कि, त्याचं देखील माझ्यावर प्रेम आहे. छोट्या छोट्या गोष्टींतून मला प्रचीती येते. मुळात माझ्या वडिलांची गणपतीवर खूप श्रध्दा होती. माझ्या घरात बरेच छोटे मोठे गणपती आहेत, जे मला भेट म्हणून मिळाले आहेत. दर मंगळवारी मला कोणी ना कोणीतरी भेट म्हणून गणपती देतं. ही माझी श्रध्दा आहे कि दर मंगळवारी मला बाप्पा भेट देतो. माझी आणि गणपतीची मैत्री आहे, मी त्याला माझा खूप मोठा आधार मानते.’

First Published on September 13, 2018 1:40 am

Web Title: ganesh utsav 2018 colors marathi serials radha prem rangi rangali and navra asava tar asa ganapati festival celebration