सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. मालिकांमध्येही गणरायाचे आगमन झालेले पाहायला मिळाले. ‘सरस्वती’ मालिकेमध्ये गणपतीचे आगमन धुमधडाक्यात झाले. गणपतीच्या आगमनाने सगळीकडेच प्रसन्न वातावरण होते. बाप्पाच्या आगमनानंतर सरस्वतीने त्याच्या महाप्रसादासाठी ११०१ मोदक देखील केले. सरस्वतीच्या हरतालिकेच्या पूजेपासून ते बाप्पाच्या प्रसाद करण्यापर्यंत विद्युलने तिच्या मार्गामध्ये अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, परंतु सरस्वतीने विद्युलच्या प्रत्येक कट उधळून लावला.

गावातील गणपतीच्या आरतीचा मान देखील सरस्वतीला मिळाला. पण, आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली आहे. मुळातच बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे सरस्वतीसमोर आलेली विघ्न देखील तो दूर करेल, तिला तो मार्ग दाखवेल आणि सरस्वती कशाप्रकारे या अडचणींमधून बाहेर पडेल हे आता पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळले.

वाचा : फ्लॅशबॅक ‘सवत माझी लाडकी’चा खुमासदारपणा

बाप्पाच्या विसर्जनासाठी ‘सरस्वती’ मालिकेमध्ये ढोल पथक आणण्यात आले आहे. स्वतः सरस्वती देखील पांढरा पंजाबी ड्रेस, पिवळ्या रंगाची ओढणी, नाकामध्ये नथ आणि फेटा अशा पारंपरिक पोशाखात तयार झाली. मालिकेमध्ये ढोल, ताशांच्या गजरात धुमधडाक्यात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे.

वाचा : ‘पहरेदार पिया की’चे निर्माते घेऊन येताहेत ‘ही’ नवी मालिका

गणपती विसर्जनाच्या दिवशी राघवला दुखापत करण्याचा कट विद्युलने रचला आहे. त्यासाठी तिने मिरवणुकीमध्ये मारेकऱ्याला देखील पाठवले आहे. याआधी देखील विद्युलने राघवला मारण्याचा प्रयत्न केला होता. पण, यावेळेस राघवला दुखापत करण्याच्या प्रयत्नात विद्युलला यश मिळेल का? देविका बोलू शकते हे सत्य राघवला कसे कळेल का? सरस्वतीला विद्युलचे सत्य कळल्यावर ती काय करेल? हे बघणे रंजक ठरणार आहे.