उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. या अमानुष घटनेवर अभिनेता फरहान खान याने संताप व्यक्त केला आहे. “ही घटना पाहून असं वाटतंय की माणूसकीचा आता अंत झाला आहे. त्या पीडित तरुणीला न्याय द्या”, अशी मागणी त्याने केली आहे.

“हाथरसमधील या अमानुष घटनेमुळे देशावर एक न पुसला जाणार डाग पडला आहे. अशा गुन्हेगारांना लपवणाऱ्या लोकांना स्वत:ची लाज वाटायला पाहिजे. पीडितेच्या कुटुंबियांना घरात कोंडून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. हा प्रकार पाहून असं वाटतंय की माणूसकीचा आता अंत झाला आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन फराहन खान याने आपला राग व्यक्त केला. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी स्वरा भास्कर, कंगना रणौत, मीरा चोप्रा, रिचा चड्ढा, रितेश देशमुख, अक्षय कुमार यांसारख्या अनेक कलाकारांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती.

आणखी वाचा- Hathras Gangrape: युपी पोलिसांकडून जबरदस्ती करण्यात आले पीडितेवर अंत्यसंस्कार, कुटुंबीयांचा दावा

दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ छाटून तिची मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला आहे. यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर २९ सप्टेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.