दिग्दर्शक अनुराग कश्यपचा टू-पार्ट माफिया ड्रामा ‘गँग्स ऑफ वासेपुर’ आता उत्तर अमेरिका आणि लॉस एंजेल्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात कोळसा खाणीने समृद्ध असलेल्या वासेपुर गावावर अधिराज्य गाजविण्यासाठी दोन माफिया कुटुंबियांमधील गँगवॉर अतिशय कौशल्यपूर्णतेने दाखविण्यात आले आहे. तीव्र हिंसात्मक आणि त्या काळच्या साचेबद्ध मांडणीमुळे हा चित्रपट भारतात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला होता. दिग्दर्शक अनुराग कश्यपचेही या चित्रपटाच्या दिग्दर्शनावरून बॉलीवूडकरांनी कौतुक केले होते.
आता हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ट्विट सिनेसिलीयस पिक्स या चित्रपटाच्या वितरक कंपनीकडून करण्यात आले आहे. अमेरिकेतही हा चित्रपट ‘गँग्स ऑफ वासेपुर’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपुर-२’ अशा आपल्या दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. याआधी या चित्रपटाचे २०१२ सालच्या कान्स चित्रपट महोत्सवातही स्क्रिनिंग झाले होते.