‘चौदा विद्या आणि चौसष्ट कला’ यांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे चार दिवस राहिले आहेत. पण गणपती बाप्पाच्या आगमनाची वर्दी देणारी गाणी कानावर पडायला सुरुवात झाली आहे. लतादीदी यांनी गायलेल्या ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ किंवा ‘गणराज रंगी नाचतो’ या गाण्यापासून ते अगदी अलीकडच्या अजय-अतुल यांच्या ‘मोरया मोरया’पर्यंत गाणी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात आणि या मंडळांच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ऐकायला मिळतात. ‘कटय़ार काळजात घुसली’ या आगामी मराठी चित्रपटातही ‘सूर निरागस हो’ हे खास गाणे तयार करण्यात आले आहे. गणपतीविषयक असलेल्या अनेक गाण्यांच्या मांदियाळीत ‘अशी चीक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं’, (उत्तरा केळकर) ‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया संकष्टी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया’ (आशालता वाबगावकर) ‘तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दीनांचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा’ (प्रल्हाद शिंदे) ही गाणी इतक्या वर्षांनंतरही तेवढीच लोकप्रिय आहेत.

‘तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दीनांचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा’ या गाण्याचा आवर्जून समावेश करावाच लागेल. हे गाणे हरेंद्र जाधव यांनी लिहिले असून याचे संगीत मधुकर पाठक यांचे आहे. या गाण्याच्या माध्यमातून गीतकार जाधव यांनी सर्वसामान्य गणेशभक्तांच्या भावनाच व्यक्त केल्या आहेत. गाण्यात कठीण शब्द अजिबात नाहीत. सर्वसामान्य किंवा ज्यांचे पोट हातावर आहे, अशा सामान्यांचे जगणे आणि त्यांची गणेशभक्ती, गरिबीमुळे असलेली मनातील व्यथा, वेदना हरेंद्र जाधव यांनी या गाण्यातून मांडल्या आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणारा गणपती बाप्पाचा सामान्य भक्त आपली व्यथा, वेदना गणपती बाप्पाला सांगतो आहे. हाच गणपती बाप्पा आपल्याला सुखाचे दिवसही नक्की दाखवेल असा विश्वासही त्याला वाटतो आहे. लोकसंगीतात असलेला विशिष्ट ठेका, उडती चाल आणि गाणे ऐकायला सुरुवात केल्यानंतर आपल्या नकळत आपली पावले ताल धरायला लागतात.
आजही फर्माईश -उत्तरा केळकर
‘अशी चीक मोत्यांची माळ’ या गाण्याला किमान २२ ते २५ वर्षे होऊन गेली आहेत. पण मी आजही कुठे जाते, गाण्यांचे कार्यक्रम करते तिथे मला आज इतक्या वर्षांनंतरही हे गाणे म्हणण्यासाठी आग्रह केला जातो, श्रोत्यांकडून त्याची फर्माईश केली जाते. साधे व सोपे शब्द आणि सुंदर चाल यामुळे हे गाणे आजही लोकप्रिय आहे. खरे तर ‘अशी चीक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्यांची गं’ हे गाणे मूळचे माझ्या आवाजातील नाही. हे मूळ गाणे जयश्री शिवराम यांनी गायलेले आहे. तसेच पुरुष स्वर श्रीनिवास कशेळकर यांचा आहे. काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका ध्वनिफितीमध्ये ‘बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला’ हे गाणे मी गायले होते तर ‘अशी चीक मोत्यांची माळ’ जयश्री शिवराम यांनी गायले होते. त्यानंतर पाच कॅसेट कंपन्यांनी हे गाणे ध्वनिफितीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविले आणि त्या पाचही कॅसेट कंपन्यांसाठी हे गाणे मी गायले. त्यामुळे साहजिकच अनेकांना ते मीच गायले आहे, असे वाटते. पण मूळ गायिका जयश्री शिवराम या आहेत.
‘अशी चीक मोत्यांची माळ’चे संगीतकार निर्मळ-अरविंद हे असून सहज सोपी व गुणगुणता येईल अशी चाल आणि पायाला ठेका धरायला लावेल असा ताल यामुळे हे गाणे अमाप लोकप्रिय झाले. यात गाण्याचे गीतकार विलास जैतापूरकर यांचाही मोठा वाटा आहे. गणपतीविषयक मी अनेक गाणी गायले असले तरी ‘अशी चीक मोत्यांची माळ’ हे गाणे सर्वात जास्त लोकप्रिय झाले.

 

भव्य मंडप, मोठमोठे देखावे आणि त्यात बसलेल्या विशालकाय गणरायाच्या मूर्तीसमोर दोन बाजूंना असलेले दोन स्टँड आणि त्या स्टँडवर बसवलेल्या मोठमोठय़ा काळ्या स्पीकर्सवर वाजणारी गाणी.. ही मुंबईतील गणेशोत्सवांची खरी ओळख म्हणायला हवी. लतादीदींच्या आवाजातील ‘जय देव जय देव जय मंगलमूर्ती..’ ही गणरायाची आरती मंडपातल्या स्पीकरवर वाजली रे वाजली की घराघरांतून बाहेर डोकावत मंडळाच्या गणपतीची पूजा सुरू झाली, याची चाहूल घेतली जाते. खालचा आवाज कमी म्हणून की काय घरातही वर्षभर गुपचूप पडून असलेल्या ‘अष्टविनायकाची आरती’चे कव्हर अडकवून कॅ सेट प्लेअरमध्ये सरकवली जायची आणि मग ‘गणराज रंगी नाचतो’ पासून ‘चिक मोत्यांची माळ’, ‘बाप्पा मोरया रे’च्या सुरांनी घरादाराचे वातावरण मंगलमय होऊन जायचे.. हे आता शब्द‘चित्र’च उरले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. डिजिटल तंत्राने कॅ सेट आणि ‘सीडी’ कालबाह्य़ करून टाकली तसे गणपतीच्या गाण्यांचे सारे गणितच बदलून टाकले आहे. आजही गणेशोत्सवात मंडपात गणपतीची गाणी वाजवली जातात. त्यात आजही ‘चिक मोत्यांची माळ’ वाजते आणि अजय-अतुलचे ‘मोरया मोरया’ही गाजते. मात्र, डिजिटली वाजणाऱ्या या सुरांनी गणपतीच्या नव्या गाण्यांची, अल्बमची वाटच बंद करून टाकली आणि सूरविश्वाशी निगडित एक मोठे मार्केट कुठलाही आवाज न करता लयाला गेले आहे..