07 March 2021

News Flash

उत्सवगीतांचा नूर आणि सूर

देवा हो देवा’, ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा, ‘गणपती अपने गाव चले’

|| भक्ती परब

‘देवा हो देवा’, ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा, ‘गणपती अपने गाव चले’, ‘अशी चिक मोत्यांची माळ होती’ आणि अशा गणपतीवरील गाण्यांचा एक काळ होता. ही गाणी आजही गणेशोत्सवात वाजली की खास वातावरण तयार होते. मान डोलू लागते, पावलं थिरकू लागतात. चित्रपट संगीतात होळीपासून ते दिवाळीपर्यंत विविध सण, उत्सवांची गाणी आपापलं वेगळं स्थान टिकवून आहेत. अलीकडे चित्रपटांमध्येच सण, उत्सवांची गाणी नसल्याने त्याची जागा आता व्यावसायिक आल्बम, व्हिडीओ, यूटय़ूबने घेतली आहे. या उत्सवी गाण्यांचा नूर आणि सूर याविषयी संगीतक्षेत्रातील मान्यवरांशी बोलून घेतलेला हा वेध..

हिंदी, मराठी चित्रपटांतील गाणी आणि व्यावसायिक आल्बम असे दोन भाग केले तर व्यावसायिक आल्बममध्ये सातत्याने सण, उत्सवांची गाणी सादर होत आहेत. गणेशोत्सव हा असा उत्सव आहे, ज्यावर खूप वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं गेलं आहे. चित्रपटात मर्यादा असल्यानेच उत्सवी गाण्यांनी आल्बमची वाट शोधली असल्याचे गायक स्वप्निल बांदोडकर यांनी सांगितले.

‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ या गाण्यापासून ‘उलाढाल’ ते ‘मोरया’ चित्रपटातील गाण्यापर्यंत गणपतीची गाणी आजही लोकप्रिय आहेत. गणपती आरतीसंग्रह, ‘पार्वतीच्या बाळा’, ‘सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला’, ‘बाप्पा मोरया रे’ ही गाणीही आजही वाजवली जातात. तरीही चित्रपटातील सण, उत्सवांची गाणी कमी होणं हा बदल एका दिवसात घडलेला नाही. त्यामागे काही कारणं असल्याकडे ‘व्हिडीओ पॅलेस’चे नानूभाई जयसिंघानी यांनी लक्ष वेधले.

निर्मात्यांसाठी खर्चीक असल्याने पहिल्यासारखी गाणी तयार केली जात नाहीत. अलीकडे कीबोर्डवर कृत्रिमपणे गाणी होतात. वेळ आणि पैसेही कमी असतात. अशा उत्सवी गाण्यांचं चित्रीकरण करणंही खूप कठीण जातं. समूह नृत्य करण्यासाठी तेवढे ७० ते ८० सहकलाकार आणावे लागतात. त्यांची वेशभूषा, रंगभूषा, नृत्यासाठी द्यावा लागणारा वेळ या सगळ्याची आर्थिक गणिते जमवावीलागतात. ‘बिग बजेट’ चित्रपट असेल तरच अशी गाणी करणं जमू शकतं आणि त्यामुळे चित्रपटांतून उत्सवी गाण्यांचं प्रमाण कमी होत चाललं असल्याचे नानूभाई म्हणाले.

संगीतकार चिनार-महेश यांच्या मते, उत्सवी गाणी चित्रपटांमधून कमी झाली असली तरी ती खासगी आल्बम्समधून मोठय़ा प्रमाणात येत आहेत. आम्हाला संगीतकार म्हणून त्या चित्रपटाच्या प्रसंगांनुरूपच गाणी करायला सांगितलं जातं. त्यामुळे अशी उत्सवांची गाणी त्यात नसतात. पण आल्बममध्ये ही गाणी आल्याने समतोल साधला गेला आहे. अशी गाणी चित्रपटातून कायमस्वरूपी जाणार नाहीत ती चित्रपटाच्या पटकथेतील प्रसंगानुसार येतील आणि संख्यात्मक ऐवजी गुणात्मक दर्जा असेल.

गणपती म्हटला की आपल्याकडे फक्त मिरवणूक हेच चित्र दिसतं. त्यात बेभान होऊ न नाचण्यापुरतीच गाणी मर्यादित झाली आहेत. गणपती हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. पण फक्त बेभान होऊ न नाचायचे अशी मानसिकता आता आहे. संवेदनशील कलाकार म्हणून मला हे खटकतं. जेव्हा संधी मिळते, तेव्हा मी संगीतातून बदल घडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, असं संगीतकार नीलेश मोहरीर यांनी सांगितले.

तर संगीतकार समीर साप्तीस्कर यांच्या मते आपल्याकडे गणपतीचं एक गाणं लोकप्रिय झालं की सगळी गाणी तशाच प्रकारची येतात. पण या गाण्यांना परंपरा असल्याने जुनी गाणी आजही ऐकली जातात. चित्रपटांमध्ये पूर्वी सण, उत्सवानुसार गाणी तयार केली जायची. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्याचा वापर व्हायचा. कधी कधी मागणी तसा पुरवठा यानुसार संगीतकारांना गाणी तयार करावी लागतात. पण आता अशी गाणी कमी होत आहेत, हे मला खूप चांगलं वाटतं.

पूर्वी संगीतकारांकडे एखादं गणपतीचं गाणं आधीच तयार असायचं. आता चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी गाणी असायला पाहिजेतच असे नाही. अशी तयार केलेली गाणी प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणणार नाहीत. आता उत्सव म्हणजे बेभान होणं या समीकरणामुळं उत्सवी गाण्यांचा नूर बदलला असल्याने या गाण्यांचा कर्कश सूर आपल्याला भंडावून सोडतो. या सुराला सुसंस्कृतपणाकडे वळविण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 1:51 am

Web Title: ganpati songs
Next Stories
1 शाहरूखसाठी एकताची ‘कसौटी आठ कोटींची ’
2 सत्तेच्या सोपानाचं ‘जुगाड’
3 ‘बालकलाकार हवेत बालमजूर नकोत’
Just Now!
X