जुन्या अभिजात चित्रपटांचा एक खजिना आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र हे चित्रपट खूप जुने असल्याने त्यांची रिळे अत्यंत वाईट परिस्थितीत असतात. या चित्रपटांचे केवळ जतन करून हा प्रश्न सुटणारा नाही. तर आजच्या पिढीलाही ते पाहावेसे वाटतील अशा पद्धतीने ते ‘डिजिटली रिस्टोअर’ करून पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित व्हायला हवेत. १९७३ सालचा अभिजात चित्रपट ‘गर्म हवा’ अशाच प्रकारे डिजिटली रिस्टोअर करण्यात आला असून १४ नोव्हेंबरला बालदिनाच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘इंडिकिनो एज्युटेन्मेट’ने अभिजात चित्रपटांना डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले आहे.
आपल्याकडे दर्जेदार आशयघन जुन्या चित्रपटांचा खजिना आहे. मात्र हे चित्रपट नीट जतन न केल्याने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्या वेळचे चित्रपटनिर्मितीचे तंत्रज्ञान व त्याच्या मर्यादांमुळे अनेक जुन्या चित्रपटांची रिळे खराब झाली आहेत. या चित्रपटांना डिजिटल स्वरूपात जतन करणे हे आव्हान आहेच. मात्र, ते डिजिटली रिस्टोअर केल्यानंतर लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे ‘इंडिकिनो एज्युटेन्मेट’चे आर. डी. देशपांडे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले. ‘डिजिटल रिस्टोरेअशन’च्या या पहिल्याच प्रयत्नात १९७३ सालच्या ‘गर्म हवा’ चित्रपटाची निवडही जाणीवपूर्वक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. एम. एस. सत्यू दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या ‘गर्म हवा’ या चित्रपटात फाळणीमुळे एका कुटुंबाची झालेली वाताहत दाखवण्यात आली आहे. ही कथा केवळ भारतातच घडते असे नाही. या कथेचा संदर्भ आजघडीला अमेरिकेला लागू पडतो, गाझाला लागू पडतो.. जगभरात जिथे जिथे सीमेवरून युद्ध पेटले आहे, तिथल्या लोकांपर्यंत ही कथा-व्यथा पोहोचलीच पाहिजे आणि म्हणूनच ‘गर्म हवा’ हा पहिला चित्रपट म्हणून निवडण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
‘पीव्हीआर’ समूहाच्या ‘डिरेक्टर्स रेअर’ या उपक्रमांतर्गत ‘गर्म हवा’ १४ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे डिजिटल रिस्टोरेशन करताना त्याच्या मूळ आशयाला धक्का न लावता चित्रपटाच्या फ्रेम्सचा दर्जा सुधारणे, चित्रपटाचा ध्वनी सुधारणे हे मोठे आव्हान होते, असे त्यांनी सांगितले. चित्रपट जुना असल्याकारणाने त्याच्या फिल्मवर ओरखडे उठले होते, काही ठिकाणी फिल्मवरचे चित्र संपूर्णपणे नाहीसे होत आले होते. त्यामुळे फिल्म लॅबचे उज्ज्वल निरगुडकर यांच्या मदतीने ‘पिक्सलाइट’ पद्धतीने त्यावर काम करण्यात आले. शिवाय, जुन्या चित्रपटांप्रमाणे यातील संवाद, ध्वनी जोरदार आहे. तो कानांना ऐकताना चांगला वाटत नाही. त्यामुळे एकूणच ध्वनीचा दर्जा उंचावणे आवश्यक होते. हे काम अमेरिकेतील ‘डिलक्स लॅब’कडून करून घेतल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. ‘गर्म हवा’बरोबरच १२ ते १३ जुन्या चांगल्या चित्रपटांचे हक्क विकत घेण्यात आले असून पुढच्या दोन वर्षांत निदान सहा चित्रपट तरी ‘डिजिटली रिस्टोअर’ करून लोकांसमोर आणण्याचा मानस असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.