असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. मात्र या जोड्यांची जुळवाजुळव या जगात आल्यानंतरच करावी लागते. त्यामुळे जोडी कितीही ‘मेड फॉर इच अदर’ असलीदेखील या जोड्या एकत्र आणण्यासाठी अनेक टप्प्यातून जावं लागतं. हीच जोड्या जुळविण्याची कथा ‘गॅटमॅट’ या चित्रपटातून उलगडली जाणार आहे.

यशराज इंडस्ट्रीजच्या सहयोगाने अवधूत गुप्ते यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचा टीझर पोस्टरचा नुकताच प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे हा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. हा चित्रपट १६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचं दिग्दर्शन निशीथ श्रीवास्तव यांनी केलं आहे.

दरम्यान, ‘गॅटमॅट’ या चित्रपटाच्या टीझर पोस्टरवर ‘आम्ही जुळवून घेऊ’ असे उपशीर्षक असून, दोन प्रेमदूतदेखील यात आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय प्रेमी युगुलांचे सांकेतिक चिन्हदेखील आपल्याला यात दिसून येत असल्यामुळे, हा एक रोमॅण्टिक चित्रपट असल्याचा अंदाज प्रेक्षकांना येतो. या टीझर पोस्टरवरून चित्रपटाच्या कास्टिंगबाबत कोणतीच माहिती मिळत जरी नसली तरी हा चित्रपट तरूणवर्गासाठी पर्वणी ठरणार आहे, हे नक्की.