करोना पॉझिटिव्ह असतानाही शूटिंगला गेल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री गौहर खान हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. करोनासंदर्भातल्या नियमांचं पालन न केल्यानं हा गुन्हा दाखल झाला आहे. यावर आता तिच्या टीमकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
गौहर खान ही एक जागरुक नागरिक असून ती प्रशासनाच्या नियमांचं पालन करत आहे असं यात म्हटलं आहे. तिचे अनेक रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्यानंतर तिने चित्रीकरणाला जायला सुरुवात केली असल्याचं तिच्या टीमकडून सांगण्यात आलं. त्याचबरोबर लोकांना आणि माध्यमसंस्थांना तिच्याबद्दल कोणतेही अंदाज न लावण्याचं किंवा भाष्य न करण्याचं सांगण्यात आलं आहे. १० दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचं निधन झाल्याने तिची मानसिक स्थिती नाजूक असल्याचंही तिच्या टीमने सांगितलं आहे.
गौहरच्या टीमने केलेलं हे स्टेटमेंट असं सांगतं की, “जे कोणी शुभेच्छा देत आहेत, काळजीने विचारपूस करत आहेत त्या सर्वांचे आभार. तिचे अनेक रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. ती एक जागरूक आणि कायदे पाळणारी नागरिक आहे आणि सध्या ती महानगरपालिकेचे सर्व नियम पाळत आहे. त्यामुळे हा विषय इथेच थांबवण्याची विनंती करत आहोत.”
काल ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये गौहर खानविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ज्यावेळी ते गौहरच्या घरी पोहोचले त्यावेळी कोणीच घराचं दार उघडलं नाही. नंतर ती शूटिंगला गेल्याचं लक्षात आलं आणि मग या अधिकाऱ्यांनी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. दहा दिवसांपूर्वीच गौहरच्या वडिलांचं निधन झालं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2021 12:54 pm