23 January 2020

News Flash

‘तुला पाहते रे’नंतर गायत्री दातारचं ‘या’ नाटकातून रंगभूमीवर पदार्पण

या नाटकात प्रेक्षकांना नाट्य अवकाशाचे थ्रीडी स्वरूप अनुभवता येणार आहे

गायत्री दातार

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तुला पाहते रे’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर या जोडीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. त्यातच इशाची भूमिका वठविणाऱ्या गायत्री दातारला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. विशेष म्हणजे आता मालिका संपल्यानंतर गायत्री लवकरच रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. गायत्री लवकरच राहुल भंडारे निर्मित ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या नव्या नाटकात झळकणार आहे.

अद्वैत थिएटर्सचं ‘निम्मा शिम्मा राक्षस’ हे बालनाट्य असून या नाटकाच्या माध्यमातून गायत्री रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने राहुल भंडारे, ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी आणि चिन्मय मांडलेकर एकत्र आले आहेत. या नाटकाची निर्मिती राहुल भंडारे यांनी केली असून दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर करत आहेत. तर रत्नाकर मतकरी यांनी हे नाटकं लिहिलं आहे.

‘निम्मा शिम्मा राक्षस’मध्ये गायत्री दातार मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत अंकुर वाढवे आणि मयुरेश पेम हे रंगमंचावर झळकणार आहेत. त्याचबरोबर इंटरकॉलेजिएट एकांकिका स्पर्धेत गाजलेले तरुण चेहरे नाटकात असणार आहेत.

दरम्यान, या नाटकात प्रेक्षकांना नाट्य अवकाशाचे थ्रीडी स्वरूप अनुभवता येणार आहे. नाटकाच्या संहितेतील विविध दृश्यांमध्ये प्रोजेक्शनच्या पातळीवर थ्रीडी मॅपिंग हे तंत्र रंगमंचावर वापरण्यात येणार आहे. जेणेकरून रंगमंचावरील अवकाश प्रेक्षकांना अधिकाधिक वास्तविक भासेल. या नाटकातील तीन गाणी चिन्मय मांडलेकर यांनी लिहिली असून जसराज जोशीने ती स्वरबद्ध केली आहेत. तर मयूरेश माडगावकर यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत.

‘तुला पाहते रे’ हया लोकप्रिय मालिकेतील इशाच्या भूमिकेत गाजलेली अभिनेत्री गायत्री दातार प्रथमच या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. या नाटकात ती शहजादीच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात तसेच अनेक नाटकात दिसणारा ऊंची लहान पण किर्ती महान अभिनेता अंकुर वाढवे हया नाटकात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या नाटकाची तालीम जोरात सुरू असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हया नाटकाचा शुभारंभ होणार आहे.

First Published on July 22, 2019 9:10 am

Web Title: gayatri datar will be seen marathi commercial drama ssj 93
Next Stories
1 ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’नंतर मार्व्हल स्टुडिओजकडून नव्या ११ प्रोजेक्ट्सची घोषणा
2 प्रियांका चोप्राचा सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात…
3 नाट्यक्षेत्रातील तरुण कलाकाराच्या आत्महत्येने पुण्यात खळबळ
Just Now!
X