भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग लवकरच अभिनेत्री गीता बासरा हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. सध्या या दोघांच्या लग्नासाठीची तयारी जोरात सुरू असून हे दोघेजण लग्नाच्या दिवशी कोणता पोशाख परिधान करणार आहेत, याच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगू लागल्या आहेत. लग्नासाठी दोघांनी पारंपरिक पोशाखालाच पसंती दिल्याचे समजत आहे. गीताला विवाहासारख्या महत्त्वपूर्ण क्षणी पारंपरिक पद्धतीने सजायचे आहे. त्यासाठी ती लेहंगा, क्रॉप ब्लाऊज आणि त्याच्याबरोबर दुपट्टा परिधान करणार आहे. या सगळ्या कपड्यांवर भारतीय पद्धतीची कलाकुसर असेल. विवाहसोहळ्यासाठी लाल आणि सोनेरी रंगातील लेहंगा आणि स्वागतसमारंभासाठी लहान आरसे लावलेला निळ्या रंगातील असे वेगवेगळे लेहंगे गीतासाठी तयार करण्यात आले आहेत. डिझायनर अर्चना कोचर हरभजन आणि गीताचे कपडे डिझाईन करणार आहे. हरभजनसाठी साध्या पण आकर्षक पद्धतीची शेरवानी डिझाईन करण्यात आली आहे. या शेरवानीवर करण्यात आलेल्या नक्षीकामामुळे ही शेरवानी अत्यंत उंची आणि आकर्षक दिसेल असेही अर्चना यांनी सांगितले. मेहंदी, संगीत, फेरे, स्वागतसमारंभ असा भरगच्च कार्यक्रम असलेला हरभजन-गीताचा विवाहसोहळा पाच दिवस चालणार आहे. २९ ऑक्टोबरला विवाह पार पडल्यानंतर १ नोव्हेंबरला दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वागतसमारंभात भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी हजेरी लावण्याची शक्यता आहे.