16 December 2017

News Flash

पुन्हा एकदा माई..!

‘घाडगे अँड सून’ ही नवीकोरी मालिका ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येत्या १४ ऑगस्टपासून

मितेश जोशी | Updated: August 13, 2017 1:38 AM

‘घाडगे अँड सून’ ही नवीकोरी मालिका ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येत्या १४ ऑगस्टपासून येत आहे

परंपरेच्या कोंदणात नात्यांची रंगत या कथासूत्रावर आधारित ‘घाडगे अँड सून’ ही नवीकोरी मालिका ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येत्या १४ ऑगस्टपासून येत आहे. प्रभावशाली संवादफेक आणि त्याला उत्कृष्ट अभिनयाची जोड असलेली अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने या मालिकेमध्ये साधना घाडगे ऊर्फ ‘माई’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. याआधीही त्यांनी मालिकेतून साकारलेली ‘माई’ प्रेक्षकांना आवडली होती. मात्र नवीन मालिकेत एका कणखर व्यक्तिमत्त्वाच्या रूपात या माईचे दर्शन होणार आहे.

या मालिकेतील घाडगे कुटुंबात पुरुषप्रधान संस्कृती प्रकर्षांने दिसते. या कुटुंबाचा वडिलोपार्जित दागिन्यांचा व्यवसाय आहे ज्याचे नाव ‘घाडगे अँड सन’ आहे आणि हा कारभार या घरातील समस्त पुरुष मंडळी सांभाळतात. मालिकेमध्ये सुकन्या कुलकर्णी-मोने आजेसासूच्या भूमिकेत आहेत. कु टुंबाची सर्वेसर्वा, स्वभावाने कणखर, परंपरेचा पगडा घेऊन आयुष्यभर जगलेली, स्पष्टवक्ती, जिच्या शब्दाला संपूर्ण घर मान देते, जिचे आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे अशी माई घाडगे आहे. त्यांच्या नातवाचं- अक्षय घाडगेचं लग्न आताच्या युगातली कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी अशा मुलीशी होतं. ज्या घरात मुलींनी व्यवसाय सांभाळलेला चालत नाही अशाच घरात ही मुलगी सून म्हणून येते. आता ही सून आपल्या आजेसासूचं मन कसं जिंकते, कसं त्या परिवाराला आपलंसं करते, त्यांचं मतपरिवर्तन कशा पद्धतीने करते आणि घराचा वडिलोपार्जित व्यवसाय ती कशी सांभाळते, कसा त्यांचा व्यवसाय पुढे नेते, हा सगळा प्रवास ‘घाडगे अँड सन’चं ‘घाडगे अँड सून’ होण्यापर्यंतचा प्रवास यात बघायला मिळणार आहे.

अशा विषयावरची मालिका आणि त्यातील माईसारखी थोडीशी परंपरावादी, करारी व्यक्तिरेखा तुम्हाला का स्वीकारावीशी वाटली, असं सुकन्या कुलकर्णी यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, मालिका व व्यक्तिरेखा स्वीकारण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे मला मालिकेच्या नावातच खूप वेगळेपणा जाणवला. ‘घाडगे अँड सून’ हे जरा वेगळं नाव आहे. मला ही माईची व्यक्तिरेखादेखील खूप आवडली. करारी पण तितकीच प्रेमळ अशी ही माई परंपरा जपणारी आहेच, पण पुढच्या पिढीला परंपरा शिकवणारी, त्याचं महत्त्व पटवून देणारी व ते स्वीकारायला लावणारी आहे. माई ही जुनाट विचारांची आहे, तर तिची नातसून ही आताच्या टेक्नोसॅव्ही विचारांची आहे. मी तुमची परंपरा स्वीकारते, तुम्ही आताचे विचार स्वीकारा, अशी ती नातसून आहे. दोन पिढय़ांचा वैचारिक वाद या मालिकेत आपल्याला दिसणार आहेत जे मला भावले. म्हणून मला ही मालिका करावीशी वाटली. या कौटुंबिक मालिकेतील पात्रं आपल्याच घरात प्रेक्षक शोधतील, अशी मला आशा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

या माईत आणि माझ्यामध्येदेखील खूप साम्य आहे, असं त्या गमतीने सांगतात. माईला पूजाअर्चा करायला खूप आवडतं, महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडताना वडीलधाऱ्या लोकांना नमस्कार करणं, त्यांची काळजी घेणं, बाहेरून घरी आल्यावर पहिलं हातपाय धुणं तिला व मला (सुकन्याला) आवडतं. या सगळ्या गोष्टींच्या मागे काही तरी विज्ञान दडलेलं आहे, असं आम्हा दोघींनापण वाटतं व त्याची कारणंदेखील आमच्याकडे तयार आहेत. म्हणून मला ही माई आवडते, असं त्या म्हणतात.

सुकन्या कुलकर्णीबरोबरच आपल्याला या मालिकेमध्ये त्यांच्या नातवाच्या भूमिकेत चिन्मय उद्गीरकर दिसणार आहे. ‘‘डेली सोपमुळे आपण तळागाळातील प्रेक्षकांसमोर पोहोचतो. एक प्रभावी माध्यम म्हणून मी या माध्यमाचा आदर करतो. आपल्या देशाने एकत्र कु टुंब पद्धत आपल्याला भेट स्वरूपात दिली आहे, पण आजकालच्या या युगात ही भेट कोणी स्वीकारत नाही. कोणाला त्या भेटीची किंमत नसते, पण या घाडगे कु टुंबाने ही लाखमोलाची भेट या युगातदेखील जपली आहे. याचीच मोहिनी माझ्यावर पडली म्हणून मी ही मालिका स्वीकारली,’’ असं चिन्मय म्हणतो. सुकन्या कु लकर्णी, चिन्मय यांच्याबरोबरच मालिकेत प्रफुल्ल सामंत, अतिशा नाईक, मंजूषा गोडसे, भाग्यश्री लिमये, उदय सबनीस, महेश जोशी, उदय साळवी, अनंत घाडगे, स्वाती लिमये अशी चांगल्या कलाकारांची मांदियाळी आहे.

‘कलर्स मराठी’चे व्यवसाय प्रमुख म्हणून नव्याने सूत्र हातात घेतलेल्या ‘व्हायकॉम-१८’चे निखिल साने या मालिकेविषयी म्हणतात, ‘घाडगे अँड सून’मध्ये सुकन्या मोने महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. मी सुकन्या मोनेंबरोबर या आधी बरीच कामं केली आहेत. प्रेक्षकांनी त्यांना बऱ्याच भूमिकांमध्ये पाहिले आहे, त्यांना भरभरून प्रेमदेखील दिले आहे. या मालिकेच्या निमित्ताने त्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षक त्यांना या वेळीही भरभरून प्रेम देतील व स्वीकारतील अशी मला आशा आहे. एखाद्या पात्राशी सहज समरस होऊन ते पात्र जिवंतपणे सादर करण्याचं कौशल्य सुकन्या मोनेंमध्ये आहे. त्यांनी साकारलेली कुठलीही व्यक्तिरेखा सहज प्रेक्षकांच्या मनात रुजते आणि हवीहवीशी वाटते. प्रेक्षकांना ती व्यक्तिरेखा आपल्यातलीच एक आहे असं वाटणं ही कलाकाराची अभिनय क्षमता असते आणि ती सुकन्या मोनेंमध्ये निश्चितच आहे. अतिशय प्रामाणिकपणे आणि सहज विविध भूमिका साकारणारी सुकन्या एक गुणी कलाकार आहेत. मालिकेबद्दल सांगायचं झालं तर परंपरेने बांधलेले असूनही आपल्या माणसांना न दुखावता आपुलकीने कशी त्यांची मनं जिंकता येतात हे ‘घाडगे अँड सून’ या नव्या मालिकेतून आम्ही दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वासही निखिल साने यांनी व्यक्त केला.

चांगल्या, नामवंत कलाकारांची मांदियाळी आणि दोन पिढय़ांमधील वैचारिक अंतरावर भाष्य करणारी ही मालिका स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे १४ ऑगस्टपासून सोम ते शनि रात्री ८.३० वाजता ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार आहे.

First Published on August 13, 2017 1:00 am

Web Title: ghadge and suun new marathi serial on colors marathi
टॅग Ghadge And Suun