ऐंशी-नव्वदच्या दशकात रामसे बंधूंचे भयपट म्हणजे एक ठरलेला साचा असायचा. एखादा जुना बंगला किंवा हवेली निवडायची आणि त्यातच सगळी कथा घडायची. ठरलेले कलाकार, ठरलेले संगीत आणि त्याच ठरावीक पठडतीली कथा. तरीदेखील एक ठरावीक प्रेक्षक वर्ग ते पाहायचा. किंबहुना दुसरं काही नसेल म्हणून असावे. गेल्या दहा-बारा वर्षांत त्यात काही प्रमाणात बदल झाला, पण त्यातदेखील एक साचा होताच. नेटफ्लिक्सने ‘सेक्रेड गेम्स’सारखी वेबसीरिज दिल्यानंतर भारतीय प्रेक्षकांमध्ये त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. ते पाहता नेटफ्लिक्सवर गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेली ‘घोल’ ही लघुमालिका टिपिकल भयपटांच्या पलीकडे जाणारी असेल अशी अपेक्षा होती. पण ती सपशेल फोल ठरली आहे.

निदा रहिम (राधिका आपटे) ही राष्ट्रीय संरक्षक पथकातील शिकाऊ  अधिकारी असते. तिचे वडील एक प्राध्यापक, पण सरकारच्या धोरणांना विरोध करणारे असतात. केवळ मुस्लीम आहे म्हणून संशय घेणे, पकडून नेणे, प्रसंगी मारून टाकणे अशा घटनांचा त्यांना प्रचंड राग असतो. एकदा त्यांची गाडी थांबवून पोलीस झडती घेतात. त्यांच्या गाडीतील पुस्तकांमुळे त्यांना अटक होणार असते पण निदाच्या हस्तक्षेपाने ती होत नाही. मात्र ही माहिती निदाच तिच्या वरिष्ठांना देते आणि तिच्या वडिलांना अटक होते. काही दिवसांनी निदाला पुढील प्रशिक्षणासाठी म्हणून एका विशेष एक्स्टॉर्शन केंद्रावर पाठवण्यात येते. पण हे प्रशिक्षण नसून त्याआडून तीदेखील राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील आहे का हे तपासण्याचा हेतू असतो. हे केंद्र अतिशय कुख्यात असून तेथील सैनिकांना आलेल्या कैद्यांकडून अति क्रूर पद्धतीने माहिती वदवून घेणे इतकेच माहीत असते. निदा आल्यानंतर तेथे अली सईद अली याकूब या दहशतवाद्यांच्या प्रमुखाला आणले जाते. त्यानंतर मात्र ही कथा थेट हॉरर वळण घेते.

घौल ही अमानवी शक्ती असून तिला आवाहन केल्यामुळे त्याने सईद अलीच्या शरीरात प्रवेश केलेला असतो. हा घौल मग त्या केंद्रावरील प्रत्येकाला त्याने केलेल्या अत्याचाराची जाणीव करून द्यायला लागतो. आणि त्याचबरोबर एकेकाला संपवू लागतो. घौलला कोण बोलवते, त्या केंद्रावर आणखीन काय काय होते हे सगळं शेवटच्या टप्प्यात घडते.

घौल ही अरबी संकल्पना आहे. मानवी मांस खाणारा आणि ज्याचं मांस खाणार त्याच्या डोक्यात असणाऱ्या गोष्टींची आणि इतरांना त्यांच्या अत्याचाराची जाणीव करून देणारा व त्यांनादेखील मारणारी अशी अमानवी शक्ती असं थोडक्यात सांगता येईल. केवळ तीनच भागांची ही मालिका पाहणे म्हणजे वेळेचा अपव्ययच आहे. एकतर लेखकाने इतक्या सगळ्या गोष्टी यामध्ये घुसडल्या आहेत की त्यातील कशाचाच नेमका परिणाम होत नाही. मालिका सुरू होते ती वाढता कट्टरतावाद, एका समुदायाला लक्ष्य करणे, चौकशीचा फार्स अशा मुद्दय़ांवर. त्यातून मग शासक नामक संस्थेची अरेरावी, टोकाची क्रूरता यावर येते. तुरूंगात गेल्यावर ती अनेक छोटय़ा छोटय़ा संवादातून आणीबाणी, सैन्याचे अधिकार, गुप्त कारवाया, दहशतवाद, समुदायाला लक्ष्य करणे, निरपराधींची हत्या या मुद्दय़ांना स्पर्श करायचा प्रयत्न करते. आणि भयपटाच्या वळणावर गेल्यानंतर पुरती फसते.

या सर्वातून भय निर्माण करण्यात दिग्दर्शक फसला आहे. एकदा का भयपट करायचा आहे हे नक्की असेल तर इतर बाबींवर किती भर द्यावा याचं भान सुटलं की असे होते. एकीकडे अतार्किक गोष्टींवर कथानक बेतायचे असेल तर तार्किक गोष्टींमध्ये किती अडकायचं हे ठरवणे गरजेचे असते. त्यामुळे भाष्य करणाऱ्या अशा अनेक गोष्टी यामध्ये आहेत, पण त्यानंतरच्या भयकथेत हरवून जातात.

संपूर्ण मालिकेतील एकाही कलाकाराच्या कामाचा ठसा उमटत नाही. राधिका आपटेने तर पुरती निराशाच केली आहे. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये देखील तिच्या कामाचा प्रभाव दिसला नव्हता. आणि येथे तर तीच महत्त्वाचे पात्र असूनदेखील नाही. एका ठरावीक साच्यात अडकावे तसा काहीसा तिचा चेहरा सध्या दिसतो आहे. सुरुवातीच्या काळातील अभिनयातला उत्स्फूर्तपणा कुठे गेला असा प्रश्न पडतो. तिला यातून लवकरच बाहेर पडावे लागेल हे निश्चित. बाकी इतर कलाकारांनी दिलेले संवाद म्हटले आहेत एवढेच.

भयपटांचे ठरावीक साच्यात वाजवले जाणारे संगीत, कोंदट अंधाऱ्या जागा वगैरे ते येथेदेखील आहे. फक्त रामसेंच्या हवेली ऐवजी येथे सैन्यदलाचा तुरुंग वापरला इतकेच. पण त्या एवढय़ाशा मालिकेतली काही दृश्यं इतकी हास्यास्पद आहेत की अगदी लहान मुलांच्या कथांमध्ये शोभतात. विशेषत: फौलाद सिंगला बोलावण्याचा प्रसंग अगदीच बालीश पद्धतीने चित्रित झाला आहे. संकलनात विशेष काही करामत दाखवावी असे पटकथेतच नसल्याने आलेले प्रसंग जोडणे एवढेच काम करावे लागले असावे. बाकी टिपिकल भयकथांप्रमाणे यात गरज नसतानाही श्रृंगारिक दृश्ये वापरली एवढेच काय ते नावीन्य म्हणता येईल.

थोडक्यात काय तर आपल्याकडील दृक्श्राव्यातील भयकथा काही वेगळं मांडू शकेल असं वाटता वाटता पुन्हा फसली एवढेच म्हणता येईल.