अभिनय, साहित्य, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात छाप पाडणारे गिरीश कर्नाड यांनी मोठ्या भावाला अधिकार मिळावा, यासाठी संघर्ष केला होता. गिरीश कर्नाड यांची आई विधवा होती आणि पहिल्या पतीपासून त्यांना एक मुलगा होता. तो आपला सख्खा भाऊ असल्याचे गिरीश कर्नाड यांना वाटायचे. पण त्यांच्या आईने ८२ व्या वर्षी कहाणी लिहिली आणि त्यावेळी कर्नाड यांना मोठा भाऊ हा सख्खा नव्हे तर सावत्र भाऊ असल्याचे समजले. सावत्र भावाला अधिकार मिळावेत, यासाठी कर्नाड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संघर्ष केला होता.

गिरीश कर्नाड यांच्या मातोश्री कृष्णाबाई या परिचारिका होत्या. त्यांना पहिल्या पतीपासून एक मुलगा होता. दरम्यानच्या काळात विधवा कृष्णाबाईंची एका डॉक्टरशी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पण डॉक्टर एका विधवेशी लग्न करणार का, असा प्रश्न त्यांना  पडला होता. अखेर पाच वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी लग्न गेले. लग्नाच्या वेळी कृष्णाबाईंचा मुलगा ८ ते ९ वर्षांचा होता.

जाणून घ्या, कर्नाड यांचा पहिला चित्रपट, वाद आणि चित्रपटासाठी झालेला खर्च

लग्नानंतर आई- बाबांनी ही गोष्ट गिरीश कर्नाड यांच्यापासून लपवून ठेवली होती. त्यामुळे मोठा भाऊ हा आपला सख्खाच भाऊ आहे, असे गिरीश कर्नाड आणि अन्य भावंडांना वाटायचे. पण ८२ व्या वर्षी आईने लिहिलेल्या कहाणीत मोठ्या मुलाविषयीचा उल्लेख केला आणि त्यावेळी मोठा भाऊ सावत्र असल्याचे कर्नाड यांना समजले होते. वडिलांचं निधन झाल्यावर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. लोक म्हणाले, की मोठ्या भावाला अग्नी देण्याचा अधिकार नाही. कारण तो त्यांचा मुलगा नाही. तो अधिकार गिरीश कर्नाड यांना देता येईल किंवा त्यांच्या मधल्या भावाला आहे. पण मोठा भाऊ देखील कर्नाड आडनाव लावत होता, त्यामुळे त्याला तो अधिकार मिळावा यासाठी संघर्ष करावा लागल्याचे गिरीश कर्नाड यांनी सांगितले होते.

गिरीश कर्नाड यांनी मातोश्री कृष्णाबाई यांच्या विषयीचा आणखी एक किस्सा सांगितला होता. ३५ वर्षांचे असताना गिरीश कर्नाड हे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी घराबाहेर गेले होते. घरी परतल्यावर गिरीश कर्नाड ड्रॉवरमध्ये एक पत्र शोधत होते. ते प्रेमपत्र त्यांच्यासाठी घरात काम करणाऱ्या मोलकरणीने लिहिले होते. मोलकरणीने कर्नाड यांच्याविषयीच्या भावना त्या पत्रात व्यक्त केल्या होत्या. पत्र सापडत नसल्याने कर्नाड शेवटी आईकडे गेले. यावर त्यांच्या आईने सांगितले की, ते पत्र मी फाडून फेकून दिले. त्या मोलकरणीला या पत्राच्या आधारे तू ब्लॅकमेल करणार का? या वयात तरुण मुलीला असे वाटणे साहजिकच आहे, असे कृष्णाबाई यांनी कर्नाड यांना सांगितले होते.