X

कर्नाड यांना ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’चा’ जीवनगौरव

गिरीश कर्नाड यांना यंदाचा ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’ जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांना यंदाचा ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’ जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. गिरीश कर्नाड यांच्या साहित्यिक क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते गिरीश कर्नाड यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहे. कर्नाडांनी गेली ५० वर्षे प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ‘बेंडा कालू ऑन टोस्ट’ ही त्यांची २०१२ मधील उत्कृष्ट कलाकृती असून यात शहरी स्थलांतर, पर्यावरणाची हानी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांचा समावेश आहे. या नाटकाचे मराठी आणि इंग्रजी भाषांतरही प्रसिद्ध झाले आहे. जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (१९९९) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर ‘इक्बाल’ (२००५) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (२००९) यात अभिनय केला आहे. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंश वृक्ष (१९७२), काडू (१९७४), ओन्दानुंडू कालाडल्ली (१९७८) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (१९८०) या चित्रपटाच्या सवरेत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे.

नाटक हे एक आव्हानात्मक क्षेत्र आहे. नाटककार त्याच्या समोरील शेकडो प्रेक्षकांना संबोधित करत असतो. नाटककाराला प्रेक्षकांची पूर्तता एकाच वेळी आणि अर्थपूर्णपणे करावी लागते, असे सांगतानाच टाटा लिटरेचर लाइव्ह हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, अशी भावना कर्नाड यांनी व्यक्त केली. भारतीय कला आणि साहित्य जगताला आकार देण्यास आणि त्याची वृद्धी करण्यास कर्नाड यांचा मोठा वाटा आहे, असे टाटा लिटरेचर लाइव्हचे संस्थापक व संचालक अनिल धारकर यांनी सांगितले. यापूर्वी २०१६ मध्ये लेखक अमिताव घोष, २०१५ साली किरण नगरकर, २०१४ मध्ये एम. टी. वासुदेवन नायर यांना आणि २०१३ साली खुशवंत सिंग, २०१२ साली सर व्ही. एस. नायपॉल आणि २०११ मध्ये महाश्वेतादेवी यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या पुरस्काराचे वितरण टाटा लिटरेचर लाइव्हच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात १९ नोव्हेंबर रोजी, नरिमन पॉइंट (मुंबई) येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स (एनसीपीए) येथे होईल. भारताचा एक सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव आणि मुंबईतील साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा, टाटा लिटरेचर लाइव्ह द मुंबई लिटफेस्ट महोत्सव १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.

  • Tags: girish-karnad,