राष्ट्रीय दूरचित्रवाणी आणि चित्रपट संस्थेमध्ये संचालक म्हणून १९७० मध्ये कार्नाड पुण्यात आल्यानंतर माझा त्यांच्याशी परिचय झाला. पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकांतील व्यक्तिरेखांना समकालीन संदर्भ देत त्यांनी नाटकांची निर्मिती केली. त्यामुळे नाटकाचा विषय जुना असला तरी त्याला नव्या सौंदर्यमूल्यांतून त्यांनी कार्नाड मुद्रेने रसिकांसमोर आणले. स्वातंत्र्यानंतर  साठोत्तरी कालखंडामध्ये विजय तेंडुलकर, बादल सरकार, मोहन राकेश आणि गिरीश कार्नाड या चारही नाटककारांनी आधुनिक भारतीय रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. कार्नाड यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता, दबावाला न जुमानता निर्भयपणे आपली मते रोखठोक मांडली. लोकशाही मूल्यांची पाठराखण करताना त्यांनी कलाकारांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा सातत्याने अधोरेखित केला. एखाद्या विचारसरणीची कठोर समीक्षा करण्यास ते कधीही कचरत नसत. नवोदित लेखकांना ते सातत्याने प्रेरणा देत असत. उत्तम सांस्कृतिक प्रशासक म्हणून त्यांची ख्याती होती. संगीत नाटक अकादमीचे प्रमुख असताना त्यांनी आजारी आणि वृद्ध कलाकारांसाठी आरोग्य विमा योजना सुरू केली होती. त्यांच्या निधनाने मी वरिष्ठ मित्र आणि तत्त्वज्ञ व्यक्तिमत्त्वास मुकलो आहे.

– सतीश आळेकर, नाटककार

भारतीय रंगभूमी ज्या वेळी चाचपडत होती, आपली ओळख शोधत होती, त्या वेळी या रंगभूमीला ओळख प्राप्त करून देणारे जे नाटककार होते, त्यात गिरीश कार्नाड यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी आधुनिक भारतीय रंगभूमीचा चेहरा बदलला. त्यांची नाटके ही अस्सल या मातीतली आहेत. त्यांनी ऐतिहासिक, लोककथा, पुराणकथांचा आधार घेऊन आपली आधुनिक नाटके रचली. ते ज्या कालखंडात लिहीत होते, त्या वेळी आजूबाजूला आधुनिक होऊ पाहणाऱ्या समाजाच्या जाणिवा त्यांच्या नाटकातून व्यक्त झाल्या. हे करताना त्यांचे नाटक कुठेही कर्कश किंवा प्रचारकी होत नाही. त्यांच्या नाटकांनी प्रेक्षकाला आनंदही दिला आणि जगण्याचे नवीन भानही दिले. ते प्रत्यक्ष जीवनातही अधिकार हिरावू पाहणाऱ्या सत्तेच्या विरोधात बोलत राहिले. आत्ताची स्थिती अशी आहे की, भारतीय रंगभूमी त्याच जुन्या वळणावर उभी आहे. नाटककार जवळजवळ बाजूला पडले आहेत. अर्थपूर्ण नाटके निर्माण होत नाही आहेत. अशा वेळी कार्नाडासारख्यांचे आपल्यातून जाणे हे चटका लावणारे आहे.

– शफाअत खान, नाटककार

बादल सरकार, मोहन राकेश आणि विजय तेंडुलकर यांच्यापेक्षा गिरीशचे नाटक वेगळे होते. त्याला इतिहास, पुराणांत जास्त रस होता. त्यामुळे त्याची नाटकं मिथकांशी जास्त संबंधित आहेत.  मिथकांशी संबंधित नाटक असते, तेव्हा त्यातील शब्द काव्यमय अंगाने जातात. त्यातून आशयाची मांडणी बदलते, नटांची देहबोली बदलते. गिरीशच्या नाटकांनी दिग्दर्शकाला आव्हान दिले. गिरीशचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे तो अत्यंत तार्किक होता. त्यामुळेच तो आजच्या आधुनिक काळाचा एक प्रवक्ता झाला होता.

– डॉ. जब्बार पटेल, दिग्दर्शक

राजकीय, सामाजिक जाणीव असलेला एक विचारवंत आपल्यातून गेला. त्यांच्या नाटकांची यादी बघितली तर बहुतेक वेळा आपल्याकडच्या लोककथा, रूपककथांना वेगळा तात्त्विक परिमाण त्यांनी दिल्याचे दिसते. त्यांच्या नाटकांमधून भारतीयपण दिसते. त्यावर पाश्चात्त्य गोष्टींचा प्रभाव नव्हता.

– विजय केंकरे, दिग्दर्शक

कार्नाड यांनी खऱ्या अर्थाने भारतीय विषय, भारतीय मिथके यांचा वापर करून नाटके लिहिली. त्यांच्या संपूर्ण लिखाणाला भारतीय मातीचा गंध होता. नाटय़कर्मीना प्रेरणा देणारी, आव्हान देणारी, काळाला भेदून जाणारी नाटके त्यांनी लिहिली.

– वामन केंद्रे, दिग्दर्शक

अत्यंत संवेदनशील, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधित्व करणारे गिरीश कार्नाड आपले विचार वेळोवेळी मांडत असत. त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल बोलणे, प्रागतिक विचार मांडणे याचा आपल्याला नैतिक आधार वाटत असतो. तो आधार त्यांच्या जाण्याने नाहीसा झाला आहे.

– चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक

स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या मुळाचा शोध घेणारे तेंडुलकर, मोहन राकेश, बादल सरकार आणि गिरीश कार्नाड हे चार नाटककार रंगभूमीचे आधारस्तंभ होते. कार्नाड यांच्या रूपाने यातील चौथा आणि अखेरचा आधारस्तंभ निखळून पडला. इतिहासाचे व्यापक आकलन त्यांनी नाटकांतून मांडले. त्यांचे ‘तुघलक’ नाटक हे तर भारतीय रंगभूमीवरील कळसाध्यायच म्हणावे लागेल. त्यांना सामाजिक प्रश्नांचे केवळ भानच होते असे नाही तर उत्तम जाण होती. वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात त्यांनी त्यांची रोखठोक मते मांडली आहेत. ते कन्नड आणि मराठी या भाषांमधील सेतू होते. त्यांच्या कार्यामुळे भारतभरातील नाटके विविध भाषांशी इतकी जुळली आणि जोडली गेली की, ती मूळ त्या त्या भाषेतीलच होऊन गेली.

– अतुल पेठे, नाटय़ दिग्दर्शक

गिरीश कार्नाड हे राष्ट्रीय पातळीवर महत्त्व असलेले नाटककार होते. त्यांनी ऐतिहासिक, पौराणिक, मिथककथांना आधुनिक परिमाण दिले. आधुनिक दृष्टिकोनातून त्यांनी त्या कथांकडे पाहिले. त्यांच्या नाटकांमधून नवा विचार मांडला गेला. मात्र हे मांडत असताना त्यांची नाटके कधीही प्रचारकी झाली नाहीत. त्यांचे नाटय़ात्म विधान तितकेच ठोस असायचे. ‘तुघलक’, ‘हयवदन’, ‘ययाति’, ‘नागमंडल’ ही सगळी नाटके खूप महत्त्वाची आहेत, कारण सर्व अंगांनी ते त्या नाटकातील आशयाला भिडतात आणि खूप छान नाटय़पूर्ण पद्धतीने एक अनुभव मिळतो. त्यांची नाटके विचारप्रवृत्तही करतात. त्यांच्या शैलीमुळे मराठीतील मातब्बर लेखकही त्यांच्या साहित्याच्या प्रेमात होते. तेंडुलकरांनाही त्यांच्या ‘तुघलक’ नाटकाचा अनुवाद करण्याचा मोह आवरला नाही. ही नाटके आजही वाचली तरी ती जुनी ठरत नाहीत. त्यांची विचारदृष्टी आजही थक्क करायला लावणारी आहे. त्यांची प्रत्येक नाटके अशी वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमधून लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत.

– प्रशांत दळवी, नाटककार, चित्रपट लेखक

लेखक आणि माणूस म्हणून गिरीश कार्नाड खूप मोठे होते. त्यांच्या नाटकातून काम करण्याची संधी मला मिळाली आणि यानिमित्ताने त्यांचा थोडाबहुत सहवास लाभला. जेव्हा जेव्हा माझी आणि कार्नाड यांची भेट होत असे तेव्हा त्यांच्यातील विनम्र माणूस मला भावत असे. अगदी अलीकडे मोहित टाकळकर यांनी त्यांचे ‘उणे पुरे शहर एक’ हे नाटक दिग्दर्शित केले. त्यामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. हे नाटक पाहिल्यानंतर त्यांनी मोहितला शाबासकी दिली होती. कार्नाड यांच्याशी माझी मैत्री होती, असे मी म्हणणार नाही; पण त्यांचा सहवास आपल्याला श्रीमंत करणारा असतो याची प्रचीती मला अनेकदा आली आहे.

– ज्योती सुभाष, अभिनेत्री

रंगभूमीवर आधुनिक जाणिवा व्यक्त करण्यासाठी लोककलांचा उपयोग करून घेणारे पहिले नाटक म्हणून ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा उल्लेख केला जातो, पण  त्याआधी ‘हयवदन’ने ते साध्य केले होते. ‘हयवदन’चा प्रयोग पाहून आधुनिक जाणिवा व्यक्त करण्यासाठी लोककलांचा वापर करता येऊ शकेल हे समजले, असे तेंडुलकर यांनी सांगितले होते, असे कार्नाड यांनी लिहून ठेवले आहे. त्यामुळे भारतीय रंगभूमीवर आधुनिक जाणिवा व्यक्त करण्यासाठी लोककलांचा वापर करण्याचे श्रेय नि:संशयपणे कार्नाड यांच्याकडे जाते. टिपू सुलतान याला मराठी इतिहासकारांनी खलनायक ठरवले असले तरी इतिहासाचा वेगळा अर्थ लावून कार्नाड यांनी जबाबदारीने त्याच्यावर नाटक लिहिले होते. नट आणि दिग्दर्शक असल्यामुळे नाटककार कार्नाड यांच्या नाटकांमध्ये प्रयोगशीलता दिसते. त्यांची नाटके शब्दांनी वाहवत गेलेली नाहीत, तर त्यामध्ये दृश्यात्म प्रतिमा आहेत.

– माधव वझे

गिरीश माझ्यापेक्षा नऊ  वर्षांनी मोठा होता. वाढत्या वयात इतरांच्या संगतीचा कळत नकळत परिणाम आपल्या जडणघडणीवर होतो. तसा गिरीशच्या व्यक्तिमत्त्वाचा खूपसा प्रभाव माझ्यावर झाला असे वाटते. साहित्य, चित्रपट, नाटक या कला कशा जोपासाव्या तसेच चांगल्या विचारांना प्रवृत्त करील, अशी कलाकृती कशी घडवावी किंवा विचार कसा करायचा हा संस्कार गिरीशमुळे व्हायचा. गिरीश बुद्धिवादी कलाकार होता. गिरीश काय किंवा डॉ. श्रीराम लागू काय, यांच्या कलेमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद सतत डोकावतो. गिरीश वागायला अगदी साधा होता. आताचे कलाकार हे राजकीय पक्षांचे असतात. गिरीश स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जपणारा होता. तो निर्भीडपणाने बोलायचा.

– डॉ. मोहन आगाशे

गिरीश कार्नाड यांची दृष्टी अतिशय समृद्ध होती. त्रिकालाबाधित अस्तित्वविषयक तत्त्वचिंतन आणि समकालीन सामाजिक, राजकीय ताणेबाणे एकाच वेळी बघू शकणारी एक विलक्षण ताकद त्यांच्यामध्ये होती. एखादी नवीन कल्पना डोक्यात आल्यानंतर एखाद्या तरुणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्यामध्ये संचारायचा.

– मकरंद साठे

‘सरगम’ अखेरचा मराठी चित्रपट

स्मिता पाटील यांच्यासमवेत ‘उंबरठा’ या चित्रपटानंतर तब्बल ३३ वर्षांनी मराठीमध्ये पुनरागमन करीत गिरीश कार्नाड यांनी भूमिका साकारलेला ‘सरगम’ हा अखेरचा चित्रपट ठरला आहे. मात्र, हा चित्रपट सध्या सेन्सॉरमध्ये अडकला असल्याने प्रदर्शित होऊ शकलेला नाही. आयुष्यात सर्व काही मिळविल्यानंतर हे सगळं म्हणजे आयुष्य नव्हे, असा विचार करून एक व्यक्ती जंगलात निघून जाते आणि तेथेच वास्तव्य करते. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या या व्यक्तीची भूमिका कार्नाड यांनी साकारली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गिरीश कार्नाड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.