विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘गर्ल्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरवरुन कलाविश्वामध्ये अनेक चर्चादेखील रंगल्या होत्या. त्यातच आता चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे. विशेष म्हणजे या टीझरमध्ये ‘बॉईज’ चक्क ‘गर्ल्स’ची ओळख करुन देत आहेत.

मुली काहीच करु शकत नाही असं म्हणणाऱ्यांना या टीझरमधून चपखल उत्तर देण्यात आल्याचं दिसून येत आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमधून या मुली मनमुरादपणे जगताना, राडा घालताना, पबमध्ये धमाल-मस्ती करताना दिसत आहेत. एकंदरीतच त्या खऱ्या अर्थाने जगण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
करणे एकंदरच लाईफ एन्जॉय करताना त्या दिसत आहेत. सर्व बंधने झुगारून स्वछंदी जगण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. ‘हम भी किसीसे कम नही’ अशाच काहीशा अंदाजात त्या आपल्याला चित्रपटात दिसणार आहेत.

मुलींची धमाल, त्यांचे गॉसिपिंगचे विषय,त्यांची जगण्याची संकल्पना अशा मुलींशी संबंधित बऱ्याच गोष्टी या अनेकदा त्यांच्यापुरताच मर्यादित असतात. त्याची कल्पना इतरांना नसते. त्यामुळे मुली लाईफ एन्जॉय करतच नाहीत, असा अनेकांचा समज असतो. हाच गैरसमज दूर करण्यासाठी दिग्दर्शक विशाल देवरुखकर घेऊन येत आहेत ‘गर्ल्स’. एकूणच काय मुलींच्या बंदिस्त विश्वात नक्की काय घडते? या प्रश्नाचे उत्तर या चित्रपटातून सर्वांना मिळणार आहे. मात्र यासाठी २९ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल.