मसक्कली तिच्या चाहत्यांना बॉलीवूडमधील काही जोडप्यांचा आदर्श देत असते. जीवनातील रोमान्स कसा टिकवावा हे याच जोडप्यांकडून शिकावे. करण सिंग ग्रोव्हर आणि बिप्स या जोडप्यांपैकीच एक. करण आणि बिपाशाच्या लग्नाला आता वर्ष होत आलंय. पुढील महिन्याच्या ३० तारखेला ते त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करतील. पण त्यांचा ‘मधूचंद्र मूड’ काही ओसरताना दिसत नाहीये. नुकताच करणने त्याच्या बायकोसोबतचा फोटो मसक्कलीला दाखवला ज्यात तो तिच्या गालांवर किस करतोय. ‘ती इतकी गोड आहे की तिच्यावर प्रेम न करणं अशक्य आहे’ असंदेखील करण म्हणाला. या नवरा बायकोचं प्रेम पाहून मसक्कलीला अगदी भरून आलं! नांदा सौख्य भरे!

दीपिका-रणबीरमध्ये चाललंय काय?

दीपिकाने नुकताच समाज माध्यमांवरून तिचा आणि रणबीरचा ‘बलम पिचकारी’ या गाण्यातला फोटो शेअर केला आणि बॉलीगॉसिपकरांमध्ये एकच खळबळ उडाली. रणबीर कपूर दीपिकाचं पुन्हा पॅचअप आणि रणवीरसोबत ब्रेकअप की काय अशा चर्चाना उधाण आलेलं. तुमची लाडकी गॉसिप गर्ल मसक्कलीने या बातमीच्या मुळाशी जाण्याचं ठरवलं आणि तिने तुमच्यासाठी या फोटोमागचं गुपित शोधूनचं काढलं. नुकताच रंगपंचमीचा सण साजरा झाला. रणबीर आणि दीपिकाचं हे गाण रंगपंचमीमध्ये ठिकठिकाणी दणक्यात वाजवलं गेलं. त्या गाण्याच्या प्रसिद्धीमुळे दीपिकाने हा फोटो शेअर केला. आता तिचं ‘गोलियों की रासलीला..’ मधलं ‘लहु मुह लग गया’ हे गाणंही रंगपंचमीवरचं आहे आणि मुख्य म्हणजे रणवीरसोबत आहे! मसक्कलीने ही शंका दीपिकाला विचारली तेव्हा ते गाणं ‘बलम पिचकारी’ इतकं प्रसिद्ध नाही असं म्हणत मसक्कलीच्या (आणि तुमच्याही) शंकांचं निरसन केलं.

-मसक्कली