हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांनी रंगवलेली सोशीक आई प्रेक्षकांनी कितीतरी वर्षे अनुभवली. त्यानंतरच्या काळात निरूपा रॉय यांच्याही बाबतीत चित्रपटांमधून ‘आई’च्या भूमिकेचा तोच कित्ता गिरवला गेला. रीमा यांनी जेव्हा ‘मैने प्यार किया’ चित्रपटात आईची भूमिका पहिल्यांदा स्वीकारली तेव्हा ती आई फार वेगळी होती असे नाही. पण त्यानंतर ‘आशिकी’मध्ये प्रेमात पडलेल्या आपल्या मुलाने पहिल्यांदा करिअर घडवावे, यासाठी आग्रही असणारी, नोकरी करून मुलाला स्वत:च्या पायावर उभे करताना अतिशय संयतपणे त्याला प्रेम आणि करिअरचा समतोल घालून देणारी रीमा यांनी साकारलेली आई त्या वेळच्या तरुणाईच्या लक्षात राहिली नसती तरच नवल! ‘हम आप के है कौन’मधली दोन मुलींची आई आणि सुंदर दिसणारी ‘समधन’, ‘हम साथ साथ है’मध्ये रामायणातील कैकेयीशी साधम्र्य साधणारी आई, आपल्या गुंड मुलाची तगमग संपवणारी ‘वास्तव’ आई अशा त्यांच्या कित्येक भूमिका ठळकपणे लक्षात राहिल्या.

मराठी आणि हिंदी चित्रपट आणि नाटकातून आपल्या सशक्त अभिनयाने प्रत्येक भूमिका जिवंत करणाऱ्या अभिनेत्री रीमा यांचे आकस्मिक निधन समस्त मराठी चित्रपट-नाटय़सृष्टीला आणि बॉलीवूडलाही चटका लावून गेले. मराठी असलेल्या रीमा यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर साकारलेल्या ‘आई’च्या भूमिकेला ‘ग्लॅमरस’ रूप मिळवून दिले. सोशीक आईची प्रतिमा त्यांनी बदलली आणि आधुनिक काळातील, पुढारलेल्या विचारांची ‘आई’ तिचे आईपण कुठेही हरपणार नाही याची काळजी घेत त्यांनी हिंदीतील आघाडीचे अभिनेते आणि अभिनेत्री यांची ‘आई’ रुपेरी पडद्यावर साकारली. केवळ ‘आई’ नव्हे तर दूरचित्रवाहिन्यांवरील काही हिंदी मालिकांमधून त्यांनी साकारलेली ‘सासू’ही वेगळा ठसा उमटवून गेली.

तसे पाहिले तर एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अनेक ज्येष्ठ अभिनेत्रींनी हिंदीत ‘आई’ म्हणून काम केले. दुर्गा खोटे, सुलोचना, ललिता पवार, रत्नमाला, सुमती गुप्ते-जोगळेकर, सीमा, आशालता बावगावकर आदी काही यातील ठळक नावे. या सगळ्या ‘आई’ गरीब, परिस्थितीने गांजलेल्या, सतत काबाडकष्ट करणाऱ्या, सोशीक अशा प्रकारच्या होत्या. काळानुरूप हिंदी चित्रपटाची भाषा आणि विषय बदलत गेले तशी हिंदी चित्रपटातील ‘आई’ची भूमिकाही बदलत गेली. अभिनेत्री रीमा यांनी ही बदललेली आई अधिक चांगल्या प्रकारे साकारली. ती साकारत असताना भूमिकेला अधिकाधिक ‘ग्लॅमर’ मिळवून दिले. रीमा यांच्या रूपाने हिंदी रुपेरी पडद्याला ‘ग्लॅमरस’ आई मिळाली. दमदार अभिनयाने रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा गाजवणाऱ्या रीमा यांनी प्रेमळ आईच्या भूमिकेला वेगळी ओळख मिळवून दिली.

१९८८ मध्ये आमिर खानच्या गाजलेल्या ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटात त्यांनी जुही चावलाच्या आईची भूमिका साकारली. बॉलीवूडमधील त्यांची ही पहिली आईची भूमिका होती. पुढे राजश्री प्रॅडक्शनच्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटात त्यांनी रंगवलेली सलमानच्या आईची भूमिका त्यांच्या अभिनय प्रवासाला कलाटणी देणारी ठरली. कारण या भूमिकेनंतर आईच्या भूमिकेच्या अनेक ऑफर्स आल्या आणि आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर त्यांनी त्या सर्व भूमिका यशस्वीपणे साकारल्या. राजश्रीकडून जेव्हा रीमा यांना चित्रपटात काम करायला तुम्ही किती मानधन घेणार? असे विचारण्यात आले, तेव्हा रीमा यांना चांगलेच दडपण आले. चित्रपटाच्या निर्मात्यांकडून त्यांनी विचार करण्यासाठी एक  दिवस मागून घेतला. त्यांनी रात्रभर या गोष्टीचा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी निर्मात्यांची भेट घेऊन मला केवळ २१ हजार रुपये द्या, असे सांगितले. त्यांच्यासाठी ही खूपच कमी रक्कम होती. हिंदी चित्रपटसृष्टीत किती पसे दिले जातात हे रीमा यांना माहीत नसावे याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी या चित्रपटासाठी स्वत:हून रीमा यांना त्यांनी मागितलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम मानधन म्हणून दिली.

मराठी चित्रपट व नाटय़सृष्टीत त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होतेच, पण ‘आई’च्या भूमिकेने हिंदीतही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सलमान खान, शाहरुख खान, माधुरी दीक्षित, काजोल आणि इतरही नायक-नायिकांच्या त्या ‘आई’ झाल्या होत्या. तरीही सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांमधून त्यांनी साकारलेली ‘आई’ विशेष गाजली. ‘कुछ कुछ होता है’ मध्ये काजोलची आई, ‘हम आपके हैं कौन’मध्ये माधुरी दीक्षितची आई, ‘मने प्यार किया’आणि ‘हम साथ साथ है’ सिनेमात सलमान खानची आई त्यांनी रंगविली. ‘वास्तव’मधील रघुभायची कणखर आई त्यांनी समर्थपणे साकारली. ‘मंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘वास्तव’, ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘आशिकी’, ‘कयामत से कयामत तक’ हे त्यांचे चित्रपट खूपच लोकप्रिय ठरले. ‘मने प्यार किया’, ‘आशिकी’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘वास्तव’ या चित्रपटांतील भूमिकेसाठी त्यांना पुरस्कारही मिळाले होते.  हिंदी चित्रपटातील ग्लॅमरस आईप्रमाणेच रीमा यांनी हिंदी मालिकांमधून साकारलेली ‘सासू’ प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. ‘तू तू मं मं’ या मालिकेत रीमा लागू यांनी साकारलेली सासूची भूमिका अविस्मरणीय अशीच आहे. या मालिकेतील सासू-सुनेच्या विनोदाने प्रेक्षकांच्या मनात त्यांनी घर केले. या मालिकेसाठी रीमा यांना उत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. अगदी आत्ता अलीकडे त्यांनी महेश भट्ट यांच्या ‘नामकरण’ या मालिकेतही नकारात्मक भूमिका साकारली. एकेकाळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांनी हिंदी चित्रपटात ‘प्रेमस्वरूप’ आई साकारली. पुढे आईपणाचा हा वारसा रीमा यांनी चालवला, पण त्या आईला ‘ग्लॅमरस मॉम’चे रूप दिले. रीमा यांचा चेहरा आणि डोळे खूप बोलके होते. त्यांनी नेहमीच खानदानी श्रीमंत, घरंदाज आणि सुखवस्तू पण तरीही स्वत:चे ठाम विचार असलेली, प्रसंगी कठोर रूप धारण करणारी, मनाने खंबीर असलेली ‘आई’ बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर साकारली. त्यांची ही ग्लॅमरस ‘आई’ पुढील अनेक वष्रे प्रेक्षकांच्या मनात कायमचेच घर करून राहील हे नक्की.