देसी गर्ल प्रियांका चोप्रा- जोनस हिने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘क्वांटिको’ या अमेरिकी मालिकेत काम करण्यापूर्वी तिचं एक गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यानंतर तिच्यावर वर्णभेदी टीका करण्यात आली. या वेळचा हा कटु अनुभव तिने आपल्या ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकात लिहिला आहे.

या पुस्तकात प्रियांका लिहिते की अमेरिकेतल्या ‘इन माय सिटी’ या पहिल्या गाण्यामुळे ती खूप आनंदात होती. आता आपण अनेक अमेरिकी नागरिकांपर्यंतही पोहोचू. मात्र तिचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. हे गाणं टिव्हीवर आल्यानंतर तिला अनेक मेल, मेसेज येऊ लागले. ज्यात तिच्यावर खूप टीका होत होती.

काही जणांनी तिला सावळी दहशतवादी म्हटलं तर काही जण तिला “आपल्या देशात परत जा आणि बुरखा घाल”, असंही म्हणाले. काही जणांनी “आपल्या देशात परत जा आणि स्वतःवर सामूहिक बलात्कार करून घे”, अशाही शब्दात टीका केल्याचं तिने लिहिलं आहे.

प्रियांकाला मोठ्या प्रमाणावर वर्णभेदाचा सामना करावा लागल्याचं ती तिच्या अनेक मुलाखतींमधून सांगत असते. ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकातही तिने तिच्या आयुष्यातले अनेक चांगले वाईट अनुभव कथन केले आहेत. हे पुस्तक बेस्टसेलर ठरलं आहे. अमेरिकेतल्या ‘न्यूयॉर्क टाईम्स’नेही या पुस्तकाला बेस्टसेलर घोषित केलं आहे.