युवा उद्योजक आणि निर्माते पुनित बालन यांच्या ‘पुनित बालन स्टुडिओज’ची निर्मिती असलेल्या ‘पुनरागमनाय च’ आणि ‘आशेची रोषणाई’ या दोन सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटांनी नुकत्याच पार पाडलेल्या ७ व्या ‘गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पुरस्कारांवर आपले नाव कोरले. ‘पुनरागमनाय च’ या लघुपटासाठी सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक महेश लिमये यांना ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ‘आशेची रोषणाई’ या लघुपटाला ‘सर्वोत्कृष्ट माहितीपट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

‘पुनरागमनाय च’ या महेश लिमये दिग्दर्शित लघुपटात करोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या ठरलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाचे उत्कट चित्रण बघायला मिळते. तसेच या लघुपटाच्या माध्यमातून डॉक्टर्स, पोलीस, महापालिका प्रशासन आणि पुणेकरांना त्यांनी करोनाकाळात दाखवलेल्या धैर्याबद्दल मानवंदना देण्यात आली आहे. या लघुपटाची संकल्पना निर्माते पुनित बालन यांची आहे. तर सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळालेल्या ‘आशेची रोषणाई’ या लघुपटाची संकल्पनाही पुनित बालन यांचीच असून आज करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी टाळेबंदीमुळे अनेक घटकांना आर्थिक फटका बसला आहे, त्या घटकांच्या आयुष्यात आनंद पसरवूया, असा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या लघुपटातून करण्यात आला आहे. या लघुपटाची सिनेमॅटोग्राफी आणि दिग्दर्शन महेश लिमये यांचे असून संगीतकार अजय-अतुल यांनी त्याला पार्श्वसंगीताचा साज चढवला आहे तर अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी ‘आशेची रोषणाई’ला चार चाँद लावले आहेत. याविषयी बोलताना पुनित बालन म्हणाले, करोना आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर आम्ही ‘बाप्पाचं घरीच विसर्जन .. सुरक्षित विसर्जन ..’, ‘पुनरागमनाय च’ आणि ‘आशेची रोषणाई’ या तीन लघुपटांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न के ला आहे. या तिन्ही लघुपटांना समाजमाध्यमांवर पुण्यासह जगभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुरस्कार मिळालेल्या या दोनही लघुपटांचे लेखन क्षितिज पटवर्धन यांनी केले असून विनोद सातव यांनी लघुपट आशयघन होण्याच्या दृष्टीने आपले सहकार्य दिले आहे. आमची निर्मिती असलेल्या या लघुपटांना समाजमाध्यमांवर रसिकांची आणि पुरस्कारांच्या रूपात समीक्षकांची मिळालेली दाद आगामी कलाकृतींसाठी आम्हाला प्रेरणा देणारी आहे.