नुकत्याच पार पडलेल्या ७ व्या ‘गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘आशेची रोषणाई’ आणि ‘पुनरागमनाय च’ या दोन लघुपटांचा सन्मान करण्यात आला. या शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘पुनरागमनाय च’ या शॉर्टफिल्मसाठी सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक महेश लिमये यांना ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्मला ‘सर्वोत्कृष्ट माहितीपट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  या दोन्ही लघुपटांमधून सामाजिक संदेश देण्यात आला असून या लघुपटांची निर्मिती पुनीत बालन स्टुडिओजने केली आहे.

‘पुनरागमनाय च’ या शॉर्टफिल्ममध्ये करोना पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेशोत्सवाचं उत्कट चित्रण करण्यात आलं आहे. यात डॉक्टर्स, पोलीस, महापालिका प्रशासन आणि पुणेकरांनी करोना काळात दाखवलेल्या धैर्यासाठी त्यांना मानवंदना देण्यात आली आहे. तर ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्ममध्ये ‘आज कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लॉकडाउनमुळे अनेक घटकांना आर्थिक फटका बसला आहे, त्या घटकांच्या आयुष्यात आनंद पसरवूया’ हा सामाजिक संदेश देण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by PUNIT BALAN (@punitbalan)

कोरोना, लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आम्ही ‘बाप्पाचं घरीच विसर्जन..सुरक्षित विसर्जन …’, ‘‘पुनरागमनाय च’ आणि ‘आशेची रोषणाई’ या तीन शॉर्टफिल्म मधून सामाजिक संदेश दिला आहे. या तीनही शॉर्टफिल्मला सोशल मीडियावर जगभरातून नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.‘पुनरागमनाय च’ व ‘आशेची रोषणाई’ या पुरस्कार मिळालेल्या दोनही शॉर्टफिल्मचे लेखन क्षितिज पटवर्धन यांनी केले असून क्रिएटिव्ह इनपूट्स विनोद सातव यांचे आहेत. आमची निर्मिती असलेल्या या शॉर्टफिल्मला सोशल मीडियावर रसिकांची आणि पुरस्कारांच्यारूपात समीक्षकांची मिळालेली दाद आगामी कलाकृतींसाठी आम्हाला प्रेरणा देणारी आहे, असं पुनित बालन म्हणाले.