अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा चित्रपट १३ दिवसांत १०० कोटींची कमाई करण्यास यशस्वी झाला आहे. भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक्समध्ये मिळवलेल्या पहिल्या सुवर्ण यशाची गाथा सांगणारा हा चित्रपट याच महिन्यात १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटानं २५.२५ कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला होता. विशेष म्हणजे जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’चं मोठं आव्हानं अक्षयसमोर होतं. मात्र हे आव्हान यशस्वीरित्या पेलत ‘गोल्ड’नं बाजी मारली आहे.
१०० कोटींचा गल्ला जमवणाऱ्या २०१८ मधील चित्रपटांच्या यादीत आता अक्षयच्या ‘गोल्ड’चाही समावेश झाला आहे. पहिल्या आठवड्यात ‘गोल्ड’नं ८९.३० कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात मात्र ‘गोल्ड’च्या घोडदौडीचा वेग मंदावला. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं जेमतेम ९.७० कोटींचा गल्ला जमवला. १०० कोटींचा गल्ला जमवणारा हा अक्षयचा नववा चित्रपट आहे अशी माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिली आहे.
या चित्रपटानं एकूण १०० कोटी ४५ लाखांची कमाई केली आहे. जर्मनीत ब्रिटिशांसाठी खेळणारे भारतीय खेळाडू आणि त्यांचा व्यवस्थापक तपन दास यांच्या भोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. स्वतंत्र भारताचा हॉकी संघ म्हणून ऑलिम्पिक्समध्ये खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंच्या जिद्दीची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळत आहे. देशभरातील जवळपास २७०० स्क्रीनवर हा चित्रपट दाखवण्यात आला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 1:13 pm