राष्ट्रीयत्वाच्या मुळाशी नेणारी गोष्ट सांगणारा अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई करत आहे. पहिल्याच दिवशी २५.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाने पाच दिवसांत ७१.३० कोटी रुपये कमावले आहेत.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ही माहिती दिली. प्रदर्शनाच्या दिवशी तुफान कमाई करत ‘गोल्ड’ने या वर्षात सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसरं स्थान पटकावलं. तर अक्षय कुमारच्याही करिअरमधला हा सर्वांधिक कमाईने ओपनिंग करणारा चित्रपट ठरला. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचाही आकडा पार करेल, यात काही शंका नाही. ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ आणि ‘पॅडमॅन’नंतर अक्षयचा हा तिसरा सुपरहिट चित्रपट ठरणार असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : ..म्हणून स्टुडिओत नव्हे तर थिएटरमध्ये एडिट होतोय आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ 

‘गोल्ड’ या चित्रपटाची कथा भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक्समध्ये मिळवलेल्या पहिल्या सोनेरी यशाची आहे. देशभरातील जवळपास २७०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. स्वतंत्र भारताचा हॉकी संघ म्हणून ऑलिम्पिक्समध्ये खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंच्या जिद्दीची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळते.

‘गोल्ड’ची पाच दिवसांची कमाई-

बुधवार (१५ ऑगस्ट)- २५.२५ कोटी रुपये
गुरुवार (१६ ऑगस्ट)- ८.१० कोटी रुपये
शुक्रवार (१७ ऑगस्ट)- १०.१० कोटी रुपये
शनिवार (१८ ऑगस्ट)- १२.३० कोटी रुपये
रविवार (१९ ऑगस्ट)- १५.५५ कोटी रुपये