गोल्ड

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘गोल्ड’ हा चित्रपट काही कारणांसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. खेळ हा विषयच असा आहे जिथे राष्ट्रवादाची भावना मनात कायम जागृत असते किंबहुना ती अनुभवायला मिळते. या चित्रपटाची कथा तर भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक्समध्ये मिळवलेल्या पहिल्या सोनेरी यशाची आहे. ही सोनेरी यशाची गाथा किती खरी-खोटी, त्या घटना- त्या व्यक्तिरेखा त्याच पद्धतीने होत्या की नाही, यावर खल करत बसण्यात अर्थ नाही. मुळात देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे हे लक्षात येताच स्वतंत्र भारताच्या हॉकी संघाने ऑलिम्पिक्समध्ये खेळायचे स्वप्न पाहणे आणि त्यासाठी दोन वर्षे आधीपासून संघ तयार करणे या प्रक्रियेत अनेक गोष्टी आपसूकच घडत जातात. राष्ट्रीयत्वाची भावना ही अशी एका दिवसात येत नाही, ती जाणीव-नेणिवेत खोलपणे उतरण्यासाठीही काही प्रयत्न करावे लागतात. या पहिल्या विजयश्रीची कथा सांगताना दिग्दर्शिका रीमा कागती यांचा हा चित्रपट त्या भावनेच्या मुळाशी घेऊन जातो.

‘गोल्ड’ची सुरुवात होते ती दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या काळात.. तपन दास (अक्षयकुमार) हे नाव हॉकीशी जोडले गेले आहे. जर्मनीत ब्रिटिशांसाठी खेळणारे भारतीय खेळाडू आणि त्यांचा व्यवस्थापक तपन दास. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ऑलिम्पिक्स बंद करण्यात आले. त्यामुळे खेळच बंद झालेल्या तपन दासने स्वत:ला दारूत बुडवून घेतले, तर इतर खेळाडूंनी आपापले पर्याय शोधले. मात्र या सगळ्यांनी एकच स्वप्न पाहिले होते ते म्हणजे स्वतंत्र भारताचा हॉकी संघ म्हणून ऑलिम्पिक्समध्ये खेळण्याचे. १९४८ साली लंडनमध्ये ऑलिम्पिक्स होणार ही घोषणा आणि नजरेच्या टप्प्यात आलेले देशाचे स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टींचा मेळ घालत तपन दास आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या ध्यासाने पेटून उठतो. त्यानंतरचा प्रवास हा एकाच वेळी भारतीय हॉकी संघ घडवण्याचा, देशासाठी खेळाडूंना एकत्र आणण्याचा आणि त्याच वेळी फाळणीच्या किमतीवर मिळालेले स्वातंत्र्य घेताना पुन्हा तीच मने दुभंगण्याचाही आहे. राष्ट्रीयत्वाची भावना क्षणार्धात बदलते. स्वप्नांचे अर्थ धर्माच्या नावावर दोन देशांत विभागल्या गेलेल्या खेळाडूंसाठीही बदलतात. भारतीय हॉकीचा कप्तान सम्राट (कुणाल कपूर), उपकप्तान इम्तियाज (विनीत सिंग) या पिढीने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हॉकीची दुसरी पिढी घडवावी लागते. तेव्हा राष्ट्रीयत्वाच्या भावनेबरोबरच वैयक्तिक खेळ की देशासाठीचा खेळ हा नित्याचा संघर्षही गुरू (अमित साध) आणि हिम्मत सिंग (सन्नी कौशल) सारख्या दोन मातबर खेळाडूंच्या निमित्ताने पाहायला मिळतो. किंबहुना याचमुळे की काय ‘गोल्ड’ आणि ‘चक दे इंडिया’ची तुलना सुरू होते, पण अशा तुलनेला काहीच अर्थ नाही.

दुसऱ्या महायुद्धापासून ते स्वातंत्र्यानंतरचा वर्षभर हा काळ उभा करणे, तोही त्या त्या संदर्भासह हे आव्हान दिग्दर्शक म्हणून रीमा कागती यांनी सहजपणे पेलले आहे. खेळाची कथा केंद्रस्थानी ठेवून तपन दाससह निवडक व्यक्तिरेखांच्या माध्यमांतून अनेक संवेदनशील विषयांना बोलके  करण्याचा खेळ चांगलाच रंगला आहे. सामन्याच्या एका क्षणी देश, धर्म, राष्ट्रवाद या सगळ्याच भावनांच्या भिंती गळून पडतात. उरते ती फक्त खेळाची भावना. जो जीता वही सिकंदर.. चांगल्या खेळाला कोणतेही लेबल न लावता मिळतो तो फक्त पाठिंबा, भरघोस प्रेम आणि हाच खरा विजयाचा क्षण म्हणायला हवा. व्यक्ती ते समष्टीपर्यंतचा हा प्रवास या एका खेळातून घडतो. अर्थात या खेळासाठी निवडलेले सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहेत.

तपन दास ही व्यक्तिरेखा मध्यवर्ती असली तरी ती इतरांवर डोईजड होत नाही, कारण ती कोणी सर्वगुणसंपन्न व्यक्तिरेखा नाही. मात्र स्वप्न रुजवण्याचे काम या व्यक्तिरेखेने केले आहे हे लक्षात ठेवून दिग्दर्शिकेने इतर व्यक्तिरेखांची मांडणी केली असल्याने प्रत्येकाला पुरेपूर वाव मिळाला आहे. अक्षयकुमारने त्याच्या नेहमीच्या सहज शैलीत ‘तपन दास’ रंगवला असून अमित साध, कुणाल कपूर, विनीत सिंग आणि नवोदित सन्नी कौशल या प्रत्येकाने आपले काम चोख बजावले आहे. मात्र इतक्या सुंदर कथेला गालबोट लागले आहे ते नको तिथे आणि नकोशा पद्धतीने येणाऱ्या गाण्यांनी.. त्याच वेळी तपन दासचे प्रयत्न आणि मेहतांसारख्या व्यक्तीचे राजकारण या गोष्टी फार ताणल्या नसत्या तर खेळाची गोष्ट अधिक वाढवता आली असती. पण तरीही शेवटाकडे येताना वर म्हटल्याप्रमाणे अनेक संघर्षांनंतर रुपेरी पडद्यावर डौलात तिरंगा फडकतो आणि राष्ट्रगीत सुरू होते तेव्हा पडद्यासमोर असलेल्यांचा ऊर अभिमानाने आणि देशप्रेमाने भरून गेलेला असतो. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर हा देशप्रेमाचा अचूक ‘गोल्ड’न क्षण साधला गेला आहे.

  • दिग्दर्शक – रीमा कागती
  • कलाकार – अक्षयकुमार, मौनी रॉय, अमित साध, कुणाल कपूर, विनीत सिंग, सन्नी कौशल.