चित्रपट किती कोटींचा तयार केला त्यापेक्षा कमी खर्चात तयार करण्यात आलेल्या चित्रपटाचा दर्जा आणि त्यातील आशय बघितला गेला तर चांगले चित्रपट ऑस्कपर्यंत पोहोचू शकतात, असे मत अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते वीरा साथीदार यांनी व्यक्त केले.
‘कोर्ट’ या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाली. या चित्रपटात प्रमुख भूमिका असलेले वीरा साथीदार यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. चित्रपट निर्मितीवर कोटय़वधी रुपये खर्च केले जात असताना त्या चित्रपटातील आशय, कथानक आणि तांत्रिकदृष्टय़ा तो किती सक्षम बनवला याचा विचार केला जात नाही. रसिकांची अभिरुची समजून कमी खर्चामध्ये दर्जेदार चित्रपटाची निर्मिती केली जाऊ शकते. मात्र, आज त्याचा विचार केला जात नाही.
‘कोर्ट’ या चित्रपटाची निर्मिती केली ती पुरस्कारासाठी नव्हे. ‘कोर्ट’मध्ये काम करण्यासंदर्भात विचारणा झाली त्यावेळी अनेक लोकांनी मला विरोध केला होता. चळवळ सोडून तुम्ही चित्रपटाच्या मागे कशाला लागता, यातून काही मिळत नाही. मुंबई-पुण्यात अनेक कलावंत आहेत. त्यामुळे तुम्ही जास्त काळ टिकू शकणार नाहीत, अशी वेगवेगळ्या प्रकारे टीका झाली. मात्र, ज्यावेळी निवड झाली आणि चित्रपटाचे कम सुरू झाले, त्यावेळी माझ्याकडून दिग्दर्शकाला जे अपेक्षित होते ते सहज होत गेले. मला त्यात अभिनय करताना कुठलीच अडचण आली नाही. अभिनयाचे ज्ञान नसल्यामुळे ते जमेल की नाही याचा विचार त्यावेळी केला नाही. संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने करायचे हा विचार मनात ठेवून काम केले आणि आज ऑस्करसाठी नामांकन झाले याचा आनंद आहे.
लोकप्रिय असलेल्या कलावंतांच्या नावावर चित्रपट चालण्याचे दिवस आता संपले आहेत. कथानक आणि त्यातील आशय चांगला असेल तर लोकप्रिय अभिनेत्यांची आज गरज नाही. ‘कोर्ट’ या चित्रपटाने हे सिद्ध केले आहे. या चित्रपटामध्ये सर्वच कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ नवीन असताना चांगली निर्मिती करण्यात आली आहे. जी भूमिका चित्रपटात केली आहे त्या भूमिकेसाठी दोनशे लोकांची चाचणी घेण्यात आली होती. त्या दोनशेमध्ये माझा समावेश नसताना मला विचारणा करण्यात आली आणि होकार दिला. चित्रपटाच्या चित्रिकरणाच्यावेळी अनेक लोक भेटत असताना चित्रपट जास्त दिवस चालणार नाही अशी टीका केली जात होती. मात्र, आज महाराष्ट्रासह ४० पेक्षा अधिक देशात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. इटलीमध्ये व्हेनिस चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड करून पुरस्कार देण्यात आला त्यावेळी वाटले की हा चित्रपट जगात जाणार असा विश्वास होता. जे टीका करीत होते ते नंतर चित्रपटाचे कौतुक करू लागले. भाऊराव कराडे यांचा ‘ख्वाडा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित असताना तो सुद्धा कमी खर्चात (एक कोटी) तयार करण्यात आला असून त्याला जगात वेगवेगळ्या महोत्सवात मान्यता मिळत आहे. रसिकांची अभिरुची बदलली असल्यामुळे सामाजिक आशयाच्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. केवळ पैसा आहे म्हणून चित्रपटांची निर्मिती करताना त्यांचा दर्जा कायम ठेवला जातो की नाही याचा विचार निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी करायची गरज आहे.
सामाजिक चळवळीत काम करणारा वीरा साथीदार कधी चित्रपटात काम करेल असे स्वप्नातही कधीही वाटले नाही आणि तो माझा पिंड नव्हता. गुराखीपासून शेतकरी, कामगार, मजूर, रिक्षाचालक, पत्रकार, कार्यकर्ता अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना अभिनेता होऊ असे कधीही वाटले नाही. नवीन पिढीतील कलावंतांनी या क्षेत्रात काम करीत असताना स्वतची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे, तसा अभिनय केला पाहिजे. केवळ एखाद्या कलावंतांची नक्कल करून अभिनय शिकता येत नाही. तो गुण अंगी असावा लागतो. ऑस्करसाठी नामांकन झाल्यानंतर जागतिक चित्रपट स्पर्धेत ‘कोर्ट’ला कसा न्याय मिळतो हे येणारा काळच ठरवेल, असेही साथीदार म्हणाले.