डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. धमाल कॉमेडी असलेला हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्तम कथा, दर्जेदार अभिनय, खुमासदार संवाद आणि विनोदाची मस्त फोडणी या साऱ्यांचा भरणा असलेल्या या चित्रपटामध्ये तब्बल २३ वर्षानंतर शिवाजी साटम आणि अलका कुबल पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत.

डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंगचा शिनेमा’ हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच शिवाजी साटम आणि अलका कुबल ही जोडी या चित्रपटात महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारात आहेत. २३ वर्षांनी ते या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. ‘सीआयडी’फेम शिवाजी साटम आणि ‘माहेरची साडी’मुळे आजही लक्षात राहिलेली अलका कुबल यांचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. हे दोघे तब्बल दोन दशकानंतर एकत्र येत असल्याने या चित्रपटाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.

अलका कुबल या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशामुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यासोबत ‘लेक चालली सासरला’, ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘माहेरचा आहेर’, ‘दुर्गा आली घरा’, ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’, ‘सुवासिनीची सत्त्वपरीक्षा’, ‘अग्निपरीक्षा’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटात त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘स्त्रीधन’ आणि ‘तुझ्यावाचून करमेना’ या चित्रपटांसाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. शिवाजी साटम हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले आणि यशस्वी अभिनेते आहेत. १९९७ साली दूरचित्रवाणीवर आलेल्या ‘सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्न या भूमिकेने ते घराघरात पोहचले आहेत. ‘एक होती वाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

पारंपारिक रितीरिवाजांपासून आधुनिक फॅशन- तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाप आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणाऱ्या बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’चा प्रदर्शित झालेला टीझर आणि तीन गाणी यांना रसिकांकडून भरपूर प्रतिसाद लाभला आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, भाऊ कदम, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरुआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आतापर्यंत अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिले आहेत. त्यात ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘मुंबई पुणे मुंबई-2’, ‘मुंबई पुणे मुंबई-3’, ‘बॉईज-2’, ‘बापजन्म’, ‘आम्ही दोघी’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘हापूस’, ‘आयडियाची कल्पना’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ आणि ‘टाइम प्लीज’ या चित्रपटांचा समावेश आहे.