एखादा चांगला विषय असेल, समस्या असेल, मुद्दा असेल आणि तो चित्रपट माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तो मनोरंजक पद्धतीनेच दाखवला पाहिजे, असा एक समज हिंदी चित्रपटकर्मीच्या मनात घट्ट रुतून बसला आहे. आणि त्याला जुन्यांबरोबर नवेही अपवाद नाहीत, ही खेदाची गोष्ट आहे. तरीही ‘स्पर्म्स ’च्या अदलाबदलीची गोष्ट सांगणारा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट अगदीच ‘स्पॅम’ झालेला नाही. आणि त्याचे श्रेय प्रामुख्याने चित्रपटाच्या लेखिका ज्योती कपूर यांना जाते..

दोन एकाच आडनावांची जोडपी, मूल होत नाही म्हणून आयव्हीएफ सेंटरमध्ये येतात. पुरुषांनी शुक्राणू द्यायचे, त्यातले चांगले शुक्राणू स्त्रीच्या गर्भात कृत्रिमरीत्या सोडले की काम फत्ते.. इतक्या सोप्यासहज भाषेत आपल्याला मूल होणारच हे आश्वासन डॉक्टरांकडून ऐकल्यानंतर आनंदलेली ही जोडपी पुढच्या प्रक्रियेसाठी वाट पाहत असतानाच एक घोळ होतो. सारख्या आडनावामुळे शुक्राणूंची अदलाबदल होते आणि आता काय करायचे? हा एकच गोंधळ वरुण-दीप्ती (अक्षय कुमार-करीना कपूर खान) आणि हनी-मोनिका (दिलजीत दोसेन-कियारा अडवाणी) या चौघांच्या आयुष्यात उडतो. या परिस्थितीतून कसे सावरायचे? याची कल्पना कोणालाच नसते. ती या जोडप्यांनाही नसते आणि हा गोंधळ घालणाऱ्या डॉक्टरांनाही नसते. सर्वसाधारणपणे या चित्रपटाची कथा दोन भागांत विभागली गेली आहे. पहिल्या भागात मूल न होऊ शकणाऱ्या जोडप्यांची मानसिक अवस्था, ते कितीही शिकलेले असले-मोठय़ा पदावर काम करत असले तरी घरात पाऊल टाकल्यानंतर त्यांना विशेषत: स्त्रीला विचारला जाणारा प्रश्न हा मूल नसल्याबद्दलच असतो. मूल हवे यासाठी एकीकडे प्रयत्नही सुरूच असतात, पण ते कोणाला सांगता येत नाहीत आणि जे ऐकवले जातेय ते ऐकवत नाही अशा अवघड जागेचे दुखणे होऊन बसते. त्यातही केवळ मूल होण्यासाठी सुरू असलेले शारीरिक संबंध, त्यांचे प्रमाण, त्यांच्या वेळा हे सगळे जुळवून आणताना होणारी त्यांची दमछाक या सगळ्या गोष्टी पूर्वार्धात वरुण आणि दीप्तीच्या निमित्ताने पाहायला मिळतात. एकीकडे सुशिक्षित, अतिशय महत्त्वाकांक्षी असे हे जोडपे, तर दुसरीकडे पठडीबाज खाऊन-पिऊन सुखी पंजाबी कुटुंबातील हनी आणि मोनिका.. ज्यांना फक्त स्वत:चे मूल हवे आहे आणि माताराणीचा आशीर्वाद समजून दोघेही त्यासाठी प्रयत्न करत आहेत. एरव्ही चुकूनही एकत्र आली नसती अशी दोन जोडपी या गोंधळामुळे एकमेकांत एका विचित्र बंधाने गुंतली जातात.

शुक्राणूंची अदलाबदल या एका घटनेभोवती बांधलेल्या या कथेत मूल हवेच आणि ते आपल्याच रक्ताचे हवे, हा अट्टहास. वारसा पुढे नेण्यासाठी असलेले मुलाचे महत्त्व आणि त्याचभोवती वर्षांनुवर्ष-पिढय़ान्पिढय़ा गुंतून बसलेली कुटुंबव्यवस्था यावर लेखिको ज्योती कपूर आणि दिग्दर्शक राज मेहता यांनी नेमके बोट ठेवले आहे. कुटुंबव्यवस्थेच्या याच आग्रहामुळे किंवा हट्टामुळे मुलं जन्माला घालणारी एक वेगळी बाजारपेठी व्यवस्था उभी राहिली आहे, हेही त्यांनी या चित्रपटात कुठेही आडपडदा न राखता दाखवून दिले आहे. एकाचवेळी गर्भधारणा, बाळंतपण, या प्रक्रियेत दोघांचेही एकाच विचाराने सहभागी असणे अशा अनेक बाबींवर चित्रपट भाष्य करतो. एकाच चित्रपटात एकाच घटनेबद्दल विचार करणाऱ्या वेगवेगळ्या वृत्तीही लेखक-दिग्दर्शक जोडीने सहजपणे दाखवून दिल्या आहेत. एकीकडे मै आपके बच्चे की माँ बननेवाली हूँ.. हा फिल्मी संवाद नवऱ्याला ऐकवण्यासाठी आसुसलेली मोनिका (जिच्यावर हिंदी चित्रपटांचा आणि हिंदी चित्रपटावर या भयानक संवादाचा पगडा आहे) तर दुसरीकडे या सगळ्या प्रक्रियेत स्त्रीला कु ठल्याकुठल्या दिव्यातून जावे लागते याची कडक शब्दांत नवऱ्याला जाणीव करून देणारी दीप्ती.. अर्थातच, हा दुसरा दिप्तीवाला जो भाग आहे तो या चित्रपटात फार महत्त्वाचा ठरतो. कारण एकदा बायकोने आप बाप बननेवाले हो.. असे सांगितले की आनंदाने वेडापिसा होणारा नायकाचा चेहरा आणि मग बायकोची काळजी घेणारा, तिला सगळे काही आणून देणारा नायकच आपण चित्रपटांमधून पाहिला आहे. इथे त्याच्याविरुद्ध कशाला हवे आहे मूल? आपले स्वातंत्र्य बरे आहे.. असे म्हणणारा नायक दिसतो. कथालेखनातले हे बदल निश्चितच सुखावणारे आहेत. कारण अशीच जोडपी आपण आजूबाजूला पाहतो आहोत. त्यामुळे ही आजची गोष्ट आहे. आपल्या रक्ताचे, आपले रूपरंग घेऊन येणारे बाळ हवे ही बापाची भावना मोठी ठरते की आपल्या पोटात वाढणारा हा जीव कोणाचाही असला तरी तो मोलाचा आहे, आपला आहे आणि त्याला बाहेरच्या जगात सुखरूप आणणे महत्त्वाचे आहे ही मातृत्वाची भावना मोठी.. या द्वंद्वापर्यंत येऊन पोहोचलेला हा चित्रपट शेवटाकडे येताना मात्र अगदी तद्दन मेलोड्रामा होतो. मात्र कलाकारांचे काम आणि वेगळी कथा या दोन गोष्टींमुळे बाकीच्या खटकणाऱ्या गोष्टी लांब राहतात.

अक्षय कुमार आणि करीना कपूर खान ही जोडी या चित्रपटात भाव खाऊन गेली आहे. प्रगल्भ अशा व्यक्तिरेखांमध्ये या दोघांना पाहणे ही निश्चितच पर्वणी आहे. अर्थात, व्यावसायिक हिंदी चित्रपट असल्याने याला नृत्य-गाणी यांची व्यवस्थित फोडणी आहे ती टाळता येणारी नाही. मात्र या दोघांच्या भूमिका निश्चितच वेगळ्या आहेत. दिलजीत दोसैन आणि कियारा अडवाणी या दोघांनीही आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. याशिवाय, आदिल हुसैन आणि टिस्का चोप्रा असे दोन चांगले कलाकार छोटेखानी भूमिकेत आहेत, पण प्रामुख्याने हा चित्रपट या चौघांभोवतीच फिरतो. उत्तम मांडणी असलेला हा चित्रपट बराचसा हसण्या-हसवण्यात खर्ची झाला आहे, पण वर म्हटल्याप्रमाणे तो वाया गेलेला नाही हीच ‘गुड न्यूज’ आहे.

दिग्दर्शक – राज मेहता

कलाकार – करीना कपूर खान, कियारा अडवाणी, टिस्का चोप्रा, अक्षय कुमार, दिलजीत दोसैन आणि आदिल हुसैन.