|| भक्ती परब

मी तुझ्याशी मराठीतूनच बोलतो. बोलताना थोडा वेळ लागेल, पण मराठीतूनच बोलतो. मी मराठी मुलगा आहे.. जॉनने अशी अनौपचारिक गप्पांना सुरुवात केल्यावर पुढे गप्पा अजूनच रंगणार याची खात्री पटली. अभिनयात मुशाफिरी करताना योग्य टप्प्यावर निर्माता होण्याचा निर्णय घेणारा जॉन अब्राहम. बॉलीवूडमधील चित्रपट निर्मितीला एक वेगळं वळण देऊ  पाहणारा जॉन, आशयप्रधान कथा निवडल्यावर चित्रपटच चित्रपटाची प्रसिद्धी करतो, असा ठाम विश्वास असणारा जॉन, अभिनेता आणि निर्माता म्हणून योग्य समतोल साधत दिग्दर्शन करण्याचं स्वप्नही प्रत्यक्षात उतरवू पाहणारा जॉन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रादेशिक चित्रपट आवडीने पाहणारा जॉन. त्याचबरोबर प्रादेशिक भाषेत चित्रपट निर्मिती करताना मराठी भाषेला प्राधान्य देणारा जॉन. सविता दामोदर परांजपे या त्याच्या पहिल्या मराठी चित्रपट निर्मितीविषयी जाणून घेताना त्याचं मनस्वी व्यक्तिमत्त्व गप्पांमधून उलगडत गेलं..

जॉनला एक गोष्ट सांगायची होती, ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचा विषय चांगला होता. आणि आता या क्षणी तो मांडणं आवश्यक होतं. तो मराठीतच मांडणं योग्य होतं, कारण जॉनच्या मते हिंदी चित्रपटापेक्षा मराठी, मल्याळम अशा प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचा आशय अधिक सकस असतो. तो पुढे म्हणाला, ‘‘मी लहानाचा मोठा या महाराष्ट्रात झालो, तर मी माझ्या मराठी भाषेतील चित्रपटाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. निर्माता म्हणून माझ्यासाठी ही अप्रतिम संधी होती. मी एक कथा सांगणारा (कथाकार) आहे. प्रत्येक चित्रपट हा काही हिंदीत बनू शकत नाही. उलट आता मराठी चित्रपटांचे हिंदीत रिमेक होत आहेत. हा ट्रेंड  बनला आहे, कदाचित ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटामुळेही ट्रेंड बनेल. पण हा चित्रपट मराठीतच व्हायला हवा होता,’’ असं तो म्हणतो. जॉन स्वत:ला भाग्यवान समजतो की या पहिल्या मराठी चित्रपटात त्याच्यासोबत स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शिका आहेत. अभिनेता सुबोध भावे ज्याचा तो चाहता आहे, अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री तृप्ती तोरडमल जिच्यामुळे या चित्रपटाची भट्टी जमून आली. या टीमबद्दल तो खूप खूश आहे. जॉन मधुकर तोरडमलांच्या अभिनय आणि लेखन कलेचाही चाहता आहे. याबद्दल तो सांगतो, ‘‘या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं, तेव्हा ते खूप आजारी होते. त्यांची एकच इच्छा होती, की त्यांना हा चित्रपट पाहायचा होता. त्यांना आम्ही हा चित्रपट दाखवला. त्यांनी चित्रपट उत्तम झाल्याचं सांगत आशीर्वादही दिला.’’

जॉनला जीवनाचे विविध पैलू उलगडणाऱ्या कथा आकर्षित करतात. जर तुमच्याकडे सशक्त कथा असेल तर भाषा कुठलीही असो त्याने फरक पडत नाही, असे जॉन सांगतो. अभिनेता म्हणून त्याला अ‍ॅक्शनपट करणं सोपं जातं असं तो म्हणाला, असं असलं तरी त्याला स्वत:ला विनोदी चित्रपट करायला आवडतात. पण ज्या गोष्टी सशक्तपणे मांडल्या जायला हव्यात त्या मी निर्माता म्हणूनच मांडतो, हेही तो मोकळेपणाने कबूल करतो. ‘विको डोनर,’, ‘मद्रास कॅफे’, ‘परमाणू’ या चित्रपट विषयांमुळे त्याचा प्रत्यय येतो. ‘निर्माता म्हणून माझे विषय, चित्रपट एक चांगला संदेश घेऊ न येतात. प्रेक्षकांना त्यातून वेगळी माहिती मिळते. १९९८ ला पोखरणमध्ये काय घडलं होतं, हे ‘परमाणू’ चित्रपटामुळे कळतं. ‘विकी डोनर’मधल्या विकी अरोराची गोष्ट, या सगळ्या कथा एकाचवेळी मनोरंजनही करतात आणि काहीतरी सांगूनही जातात. ही त्यांची खासियत आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपटसुद्धा तसाच खास असणार आहे’, असं तो म्हणतो. दर्जेदार आशय हेच आपल्या निर्मितीसंस्थेचं वैशिष्टय़ आहे, असं सांगतानाच व्यक्तिश: आपल्याला विनोदी चित्रपट आवडतात, हेही तो मस्त हसून सांगतो. कारण जॉनचं चित्रपटावर प्रेम आहे, तो चोवीस तास चित्रपटाच्याच विचारात असतो. चित्रपट हा त्याचा श्वास आहे. तो माणसांना भेटला तरी त्याच्या डोक्यात हा विचार चालू असतो की या माणसाच्या मनात आता काय सुरू असेल, यांच्यावर कशा पद्धतीने चित्रपट बनवता येईल. वास्तव घटना, कथांना व्यावसायिकरीत्या सादर करणं हे जॉनचं निर्माता म्हणून ध्येय आहे. तो अभिनेता आणि निर्माता म्हणून नेहमीच स्वत:ला या कामात झोकून देतो. लवकरच त्याला दिग्दर्शक व्हायचं आहे. निर्माता म्हणून प्रादेशिक चित्रपट करणं कठीण आहे की सोपं यावर त्याचं पटकन उत्तर आलं की त्याच्यासाठी सोपं आहे, कारण त्याला कथा आवडली तर कुठल्याही प्रादेशिक भाषेत ती सादर करायला आवडतं. त्याला अजून एक कथा आवडली आहे आणि केरळमधल्या एकाने ती सांगितली आहे. ती कथा त्याला मल्याळम भाषेतच सादर करायची आहे. चांगल्या कथेला भाषेचं बंधन नसतं, याचा पुनरुच्चार तो सातत्याने करतो. अभिनेता म्हणून त्याचा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तो चांगली कामगिरी करेल असं सांगतानाच ‘सविता दामोदर परांजपे’सुद्धा इच्छित यश मिळवेल याचीही त्याला खात्री आहे. सध्या तो ‘रोमियो अकबर वॉल्टर’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे, त्याचबरोबर ‘बाटला हाऊ स’ या चित्रपटाच्या निर्मितीतही तो गुंतला आहे.

चित्रपटांपेक्षा थोडा वेगळा प्रश्न त्याच्या फिटनेसच्या रहस्याविषयी विचारला असता तो म्हणाला, ‘‘मी दारू पीत नाही. सिगरेट अजिबात ओढत नाही. रात्री साडेनऊ ला झोपतो आणि सकाळी साडेचारला उठतो, मी कधीच डाएटला आणि व्यायामाला बुट्टी मारत नाही. एक शिस्त लावून घेतलीय याबाबतीत स्वत:ला,’’ असंही तो सांगतो.

चित्रपट आणि शारीरिक तंदुरुस्ती राखण्यात व्यग्र असलेल्या जॉनने ‘नटसम्राट’, ‘सैराट’, ‘मितवा’ असे काही अलीकडील मराठी चित्रपट पाहिले आहेत, त्याला प्रादेशिक चित्रपट पाहायला खूप आवडतं. आंतरराष्ट्रीय चित्रपटही तो बघतो. मराठी चित्रपटाची झेप तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे, त्यामुळे हे आपल्याला माहिती असायलाच हवं. मराठीत तेवढी क्षमता आहे. मुळात जॉनला प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे चित्रपट बनवावेसे वाटतात. आणि त्यासोबत काही संदेश पोहोचवता आला तर ती चांगली गोष्ट आहे, असं त्याला वाटतं. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठीच चित्रपट बनवले पाहिजेत, नुसता सामाजिक संदेश देण्यासाठी चित्रपट बनवला तर तो कधीच यशस्वी होत नाही, असं जॉनचं मत आहे. कारण चित्रपट बनवणं म्हणजे डॉक्युड्रामा नव्हे. चित्रपट बनवताना तो मनोरंजकच असला पाहिजे, हा त्याचा आग्रह आहे.

स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांचं अनुभवविश्व मांडणाऱ्या चित्रपटांविषयी जॉन म्हणाला, भारतात राहणं हे स्त्रियांसाठी किती असुरक्षित आहे, यावर बोलंलं गेलं पाहिजे. समाजमनाच्या चौकटीत स्त्रियांना दबावाखाली वावरावं लागतं. त्यांच्यावर ताण असतो. तरी तो ताण सहन करण्याकडे त्यांचा कल असतो. ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटामध्ये समाजात लग्नसंस्थेला असणारा मान, कितीही मानसिक – शारीरिक घुसमट झाली तरी लग्न टिकवून ठेवण्याची स्त्रीची धडपड हा विषय दिग्दर्शिका स्वप्ना यांनी चांगल्या प्रकारे हाताळला आहे. आजघडीला हा विषय मांडणं अतिशय गरजेचं होतं. स्त्रीच्या मनाचा कोंडमारा, या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेबाबत जे घडतं याविषयी अधिक काही सांगू इच्छित नाही, पण या चित्रपटाचा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे. सर्व स्तरातील, इतर भाषांतील प्रेक्षकही या चित्रपटाच्या कथेशी जोडले जातील, असा विश्वास जॉनला वाटतो. जॉनला भारतीय चित्रपटसृष्टीत बदल घडवायचा आहे. चित्रपटाच्या विषय निवडीचा प्रेक्षकांनी आदर केला पाहिजे, आणि त्या चित्रपटाने चांगला व्यवसायही केला पाहिजे, हे जॉनचं चित्रपटनिर्मितीमागचं सूत्रही यावेळी जाणून घेता आलं.