गुगल नेहमी दिवसाचे महत्त्व अधोरेखीत करणारे कलात्मक आणि लक्षवेधी ‘डुडल’ तयार करते. आजही असेच खास ‘डुडल’ तयार करण्यात आले असून, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांना ते समर्पित करण्यात आले आहे. सितारा देवी यांच्या जयंतीनिमित्त हे ‘डुडल’ साकारण्यात आले असून, गुगल सुरु करताच सर्वप्रथम हे ‘डुडल’ सर्वांचे लक्ष वेधत आहे. एक देखणी, बोलक्या डोळ्यांची नृत्यांगना या ‘डुडल’मध्ये साकारण्यात आली आहे. घुंगरु, तबला, तंबोरा ही वाद्येही पाहायला मिळतात.

सितारा देवी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त साकारण्यात आलेल्या या ‘डुडल’मुळे भारतीय कला आणि संस्कृतीचाही सन्मान झाला आहे. कलाविश्वात सितारा देवी यांचे नाव आदराने घेतले जाते. सितारा देवींनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी सादर केलेले नृत्य पहून खुद्द गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना ‘कथ्थक क्वीन’ ही उपाधी दिली होती.

सितारा देवी यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ‘संगीत नाटक अकादमी’, ‘पद्मश्री’, ‘कालिदास सन्मान’ या पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. फक्त कथक नृत्यच नव्हे, तर अन्य भारतीय शास्त्रीय नृत्यशैली आणि लोकनृत्यांमध्येही त्या पारंगत होत्या. रुसी बॅले आणि काही पाश्चिमात्य नृत्यप्रकाराचेही त्यांनी प्रशिक्षण घेतले होते.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला, माला सिन्हा, रेखा, काजोल या अभिनेत्रींनीही सितारा देवी यांच्याकडून कथ्थक नृत्याचे धडे घेतले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी काही हिंदी चित्रपटातून अभिनय आणि नृत्यही सादर केले होते. ‘शहर का जादू’, ‘जजमेंट ऑफ अल्लाह’, ‘नगीना आणि ‘मदर इंडिया’ या चित्रपटांचा त्यात समावेश आहे.