मोगॅम्बो खुश हुवा! हा डायलॉग उच्चारला की आठवण होते ती अमरिश पुरी यांची. वैविध्यपूर्ण आणि विविधरंगी भूमिका जगणारा आणि पडद्यावर साकरणाऱ्या या महान अभिनेत्याच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार केलं आहे. त्यांचे भेदक डोळे, त्यांचा पहाडी आवाज आणि करारी मुद्रा या गुणांवर ते भूमिका जगत होते. मग तो नगिना सिनेमातला भैरवनाथ असो किंवा दामिनी सिनेमातला बॅरिस्टर इंदरजीत चढ्ढा. तहलका सिनेमातला जनरल डाँग असो की नायक सिनेमातला मुख्यमंत्री प्रत्येक भूमिका ते जगले आहेत.

१९६७ ते २००५ अशी मोठी कारकीर्द त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत गाजवली. सिनेमा म्हटलं की नायकाची चर्चा होतेच. मात्र पूर्वीच्या काळी जीवन, प्राण, अजित यांनी खलनायक म्हणून नाव कमवलं. तसंच नाव अमरिश पुरी यांनीही पुढच्या काळात कमवलं असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, पंजाबी, मल्याळम आणि तामिळ सिनेमांमध्ये काम केलं. अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार या दोघांनी एकत्र काम केलेल्या शक्ती या सिनेमात व्हिलन साकारला तो अमरिश पुरी यांनी. दोन दिग्गज समोर असतानाही त्यांनी लक्षात राहिल अशीच भूमिका साकारली.

गांधी या सिनेमातला त्यांनी साकारलेला खानही लोकांच्या चांगलाच लक्षात राहिला. स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम या हॉलिवूडपटातही अमरिश पुरी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. त्यांचा व्हिलन जितका लक्षात राहिला तेवढाच त्यांचा चरित्र नायकही मग तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमातला ठाकूर बलदेव असो की गर्दिश सिनेमातला हवालदार ते प्रत्येक भूमिका जगले. चायना गेटमध्ये त्यांनी केलेली भूमिकाही लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात होती. घातक या सिनेमात त्यांनी साकारलेला बाप आजही डोळ्यात पाणी आणतो. अशा या महानायकाच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार केलं आहे. त्यामुळे आज जेव्हा गुगल सुरू कराल तेव्हा तुम्हाला मोगॅम्बो खुश हुवा या संवादाची आठवण नक्की येईल.