उर्दू भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी आग्रही असलेल्या ‘नॅशनल काउन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज’ भाषेच्या प्रचारासाठी आघाडीच्या कलाकारांची मदत घेण्याच्या विचारात आहे. उर्दू भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी आपण सलमान, शाहरूख खान आणि कतरिना कैफीची मदत घेणार असल्याचं काउन्सिलनं सांगितलं.

मनुष्यबळ विकास खात्याच्या अख्त्यारित येणाऱ्या एनसीपीयूएलनं या तिन्ही आघाडीच्या कलाकारांचा विचार उर्दू भाषेच्या प्रचारासाठी केला आहे. एनसीपीयूएल ही संस्था उर्दू आणि अरबी या भाषांमध्ये अधिक संशोधन करण्याचं तसेच ही भाषा शिकवण्याचं कामही करते. उर्दूच्या प्रचार आणि प्रसारासाठी केंद्र सरकारचं मनुष्यबळ खातं त्यांना दरवर्षी १७६ कोटींचा निधी देतं. यात दुपटीनं वाढ करत सरकारनं यंदा ३३२ कोटी देऊ केले आहेत. त्यामुळे या भाषेचा अधिक मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यासाठी एनसीपीयूएल या कलाकारांची मदत घेण्याचं ठरवलं आहे.

सलमान खान, कतरिना कैफ आणि शाहरूख खान या तिघांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे या कलाकारांच्या मदतीनं उर्दू भाषा अधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न सरकार करत आहेत. याकरता तिघांच्या नावाचा विचार केला जात आहे. मात्र अनेकांनी कतरिनाला यावरून सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. कतरिना हिंदी नीट बोलू शकत ती उर्दूचा काय प्रचार करणार असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.