प्रभातचा ‘संत तुकाराम’ हा मी माझ्या आयुष्यात पाहिलेला पहिला मराठी चित्रपट असून तो दिवस आयुष्यातील सर्वात संस्मरणीय होता, असे प्रतिपादन हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी माहिम येथे केले. सिटीलाईट चित्रपटगृहात झालेल्या ‘सिटीलाईट मराठी चित्रपट महोत्सवा’चे उद्घाटन निहलानी यांच्या हस्ते गेल्या आठवडय़ात झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कोणतीही अत्याधुनिक तंत्रसामग्री नसताना त्या काळात चित्रपटात चित्रित केलेली दृश्ये, चमत्कार आणि एकूणच चित्रपटाचा प्रभाव माझ्यावर पडला आणि चित्रपटाची ताकद काय असते हे मला सर्वप्रथम जाणवले, असे नमूद करून निहलानी म्हणाले,  मराठी चित्रपट आणि आपले काहीसे योगायोगाचे नाते आहे. चित्रपटसृष्टीत मी छायाचित्रकार म्हणून सुरुवात केली. तो चित्रपट मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या मराठी चित्रपटावरच आधारित होता. या निमित्ताने तेंडुलकर यांच्याशी परिचय झाला आणि पुढे माझ्या ‘आक्रोश’, ‘अर्धसत्य’ या चित्रपटाशीही ते संबंधित होते. त्यामुळे मराठी चित्रपटांबरोबर माझे भावनिक नाते जुळले आहे. देशातील अन्य कोणत्याही प्रादेशिक भाषेतील चित्रपटांपेक्षा मराठीत वेगवेगळे विषय आणि आशय यावर अनेक चित्रपट तयार होत आहेत. मराठीत तरुण पिढीच्या माध्यमातून नवी गुणवत्ता व हुषारी मोठय़ा प्रमाणात पुढे येत आहे. हे सध्या फक्त मराठीतच पाहायला मिळत आहे, असे कौतुकही निहलानी यांनी या वेळी केले.