बॉलिवूड अभिनेता गोविंदा कादर खान यांना वडिलांच्या स्थानी मानायचा. चित्रपटसृष्टीतील त्याच्या यशात सर्वाधिक योगदान हे कादर खान यांचं होतं. मात्र, कादर खान यांची तब्येत बिघडल्यानंतर गोविंदानं एकदाही त्यांना फोन केला नाही, असं म्हणत दिवंगत अभिनेते कादर खान यांच्या मुलानं गोविंदाच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

‘गोविंदा कादर खान यांना वडिलांच्या स्थानी मानायचा, मग त्यानं इतक्या वर्षांत त्यांना कितीवेळा फोन केला हे त्यालाच विचारावं, इतकंच कशाला वडिलांच्या निधनानंतरही गोविंदानं आम्हाला फोन करण्याचं सौजन्य दाखवलं नाही . हे चित्रपटसृष्टीतील वास्तव आहे इथे कोणाच्याच भावना या खऱ्या नसतात’ असं म्हणत सरफराजनं आपली नाराजी व्यक्त केली आहे. आएएनएस वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

९० च्या दशकात डेव्हिड धवन, गोविंदा आणि कादर खान या त्रिकुटानं तर रुपेरी पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला. आपल्या टोकदार आणि अफलातून संवादालेखनानं त्यांनी गोविंदाची कारकीर्द खऱ्या अर्थानं घडवली होती.‘ते माझे उस्तादच नव्हते तर माझ्यासाठी ते वडिलांच्या स्थानी होते. त्यांच्या परिसस्पर्शानं त्यांनी प्रत्येक सामान्य कलाकाराला सुपरस्टार बनवलं. त्यांच्या जाण्यानं मी खूप काही गमावलं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो इतकीच प्रार्थना मी करतो’ असं लिहित गोविंदानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांना आदरांजलीही वाहिली होती. मात्र प्रत्यक्षात कादर खान यांच्या तब्येतीची विचारपूस एकदाही गोविंदानं केली नाही असा आरोप सरफराजनं केला आहे.

गोविंदाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कुली नंबर १’, ‘राजा बाबू’, ‘साजन चले ससुराल’ यांसारख्या चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या. डेव्हिड धवन यांच्या बऱ्याच चित्रपटात कादर खान हे ‘मुलीचा खडूस बाप’ असंत तर गोविंदा हा त्यांचा ‘नावडता जावई’ असे आणि त्यामुळेच या दोघांमधील चटपटीत संवादांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. ‘हिरो नंबर १’, ‘अनाडी नंबर १’, ‘जोरू का गुलाम’, ‘अखियोंसे गोली मारे’, ‘दुल्हे राजा’, ‘हसीना मान जायेगी’, ‘आँटी नंबर १’ यांसारख्या चित्रपटात कादर खान आणि गोविंदा यांनी एकत्र काम केलं. ३१ डिसेंबरला कादर खान यांचं निधन झालं. कॅडनात त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी (३ जानेवारी)रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.