‘जग्गा जासूस’चे दिग्दर्शक अनुराग बासू यांना चित्रपटावरून सुनावल्यानंतर ऋषी कपूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला आणि निर्माता म्हणून त्याचा पहिला चित्रपट ‘जग्गा जासूस’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याचे खापर ऋषी कपूर यांनी अनुराग बासूवर फोडले. अनुराग बासू यांना बेजबाबदार म्हणत गोविंदाची भूमिका चित्रपटातून काढून टाकण्यावरही त्यांनी सवाल केला.

‘मिड डे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, ‘गोविंदासारख्या दिग्गज कलाकाराला चित्रपटात भूमिका दिली आणि फायनल कटमध्ये त्यांची भूमिकाच काढून टाकली.’ ऋषी कपूर यांच्या वक्तव्याने गोविंदा आनंदित झाला असून, पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यासंदर्भात प्रश्न विचारले असता गोविंदा म्हणाला की, ‘ऋषी कपूर यांचे मी आभार मानतो. अखेर त्यांनी चिंता व्यक्त केली. चांगले रक्त कधी चुकीचे बोलूच शकत नाही.’

VIDEO : नितारासोबतचं ‘डे आऊट’ अक्षयला पडलं महागात

कपूर कुटुंबाप्रती असलेल्या आदर आणि प्रेमामुळे ‘जग्गा जासूस’ चित्रपटात कॅमिओ करण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया गोविंदाने याआधी एका मुलाखतीत दिली होती. ‘कपूर कुटुंबासाठी असलेल्या आदरामुळे माझी भूमिका काढून टाकल्याबद्दल मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. चित्रपटासंदर्भातील प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेण्याचा अधिकार दिग्दर्शकाला असतो. मात्र त्यात जबाबदारपणा दाखवण्याची अपेक्षा होती. दिग्दर्शकाला नेमकं काय करायचं होतं हेच मला समजलं नाही. ते (अनुराग) आपल्याच कामात व्यग्र होते आणि मला माझ्या भूमिकेबाबत व्यवस्थित समजावलंही नव्हतं. तरीसुद्धा मी एकही पैसा न घेता भूमिका साकारली. माझी तब्येत बरी नसतानाही मी दक्षिण आफ्रिकेला गेलो आणि शूटिंग पूर्ण केलं,’ असे गोविंदा म्हणाला.

वाचा : ‘मिका सिंगने पाकिस्तानला जावं’

गोविंदाची भूमिका काढून टाकण्याबाबत रणबीरला विचारले असता तो म्हणाला की, ‘गोविंदा यांची संपूर्ण भूमिका चित्रपटातून काढून टाकण्यात आली आणि यात अनुराग बासू आणि माझी चूक आहे.’ अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीही अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. ३ वर्षे रखडलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. प्रेक्षकांची मनं जिंकण्यात हा चित्रपट मात्र अपयशी ठरला.