29 May 2020

News Flash

शासनाच्या ‘जीआर’ची कथा आता पडद्यावर

सरकारी यंत्रणा आणि त्यात काम करणाऱ्यांसाठी ‘जीआर’ हा अत्यंत परवलीचा शब्द आहे.

| April 7, 2015 06:16 am

सरकारी यंत्रणा आणि त्यात काम करणाऱ्यांसाठी ‘जीआर’ हा अत्यंत परवलीचा शब्द आहे. सरकारची योजना असो, एखादा प्रकल्प असो, प्रस्ताव असो किंवा लोकांनी सरकारदरबारी केलेली मागणी असो, त्यावर शासन काय निर्णय घेते आहे याचे उत्तर ‘जीआर.’ सरकारी यंत्रणेतील या ‘जीआर’चे महत्त्व आणि त्यामुळे सरकारी यंत्रणेच्या कार्यवाहीपासून ते सर्वसामान्यांच्या वहिवाटीवर होणारा परिणाम मांडणारा ‘जीआर’ नावाचा मराठी चित्रपट येतो आहे.
‘धग’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळविणारे दिग्दर्शक शिवाजी लोटन-पाटील हे ‘जीआर’ या आपल्या आगामी चित्रपटातून आणखी एक सामाजिक विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडणार आहेत. जीआर म्हणजे गव्हर्न्मेंट रेझोल्यूशन. सरकारी दप्तरातला हा इंग्रजी शब्द सर्वसामान्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाचा असतो. काम कुठलेही असेल त्या बाबतीत सरकारने काढलेल्या आदेशावर बोट ठेवूनच पुढची कार्यवाही होत असते. त्याच्या परिणामस्वरूप सर्वसामान्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं नाहीतर वाईट घडत राहते. अशाच एका शासन निर्णयामुळे काय घडू शकते, त्याचे परिणाम किती दूरगामी असू शकतात, हा आपल्या चित्रपटाचा विषय असल्याचे शिवाजी लोटन-पाटील यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
‘जीआर’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून सध्या कोल्हापुरात चित्रपटाचे युनिट तळ ठोकून आहे. अभिनेत्री वर्षां उसगांवकर, उमेश कामत आणि नवोदित अभिनेत्री मयूरी देशमुख यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक म्हणून आपण वर्षां उसगांवकर आणि उमेश कामत यांच्यासारख्या कलावंतांसोबत पहिल्यांदाच काम करीत आहोत. मात्र, ‘धग’ या पहिल्याच चित्रपटात उपेंद्र लिमये आणि नागेश भोसले यांच्यासारख्या अनुभवी, कसलेल्या कलावंतांसोबत काम केल्यानंतर आता कसलेही दडपण येत नसल्याचे शिवाजी लोटन-पाटील यांनी सांगितले. ‘जीआर’चे चित्रीकरण कोल्हापुरातच होणार असून मे महिन्यात चित्रपट पूर्ण करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, ‘धग’ या चित्रपटानंतर त्यांनी दिग्दर्शक म्हणून ‘३१ऑक्टोबर ९१८४’ हा पहिला हिंदी चित्रपटही पूर्ण केला असून ऑक्टोबर २०१५ मध्ये तो प्रदर्शित केला जाणार असल्याची निर्मात्यांची योजना आहे, असे ते म्हणाले. सोहा अली खान आणि वीर दास या कलावंतांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. ‘जीआर’ पूर्ण झाल्यावर लागोपाठ दोन मराठी चित्रपट करीत असल्याची माहितीही शिवाजी लोटन-पाटील यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2015 6:16 am

Web Title: gr upcoming marathi movie
टॅग Marathi Movie
Next Stories
1 बॉलिवूडमधील नवीन जोडी – कतरिना कैफ आणि सिध्दार्थ मल्होत्रा
2 सतीश राजवाडेची भाईगिरी!
3 शाहरुखने दिला अब्रामच्या हाती झाडू!
Just Now!
X