‘चेन्नई एक्स्प्रेस’,‘यह जवानी है दिवानी’, ‘रेस २’ आणि या वर्षांच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत चौथ्या चित्रपटाची भर पडली आहे ती ‘ग्रँड मस्ती’ या चित्रपटाची. हिंदी चित्रपटसृष्टीला ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ हा प्रकार नवीन नसला तरी सर्रास नाही. अशा चित्रपटांना मिळणारा मर्यादित प्रेक्षकवर्ग हे अ‍ॅडल्ट कॉमेडी न बनवण्यामागचे फार मोठे कारण राहिले आहे. पण, ग्रँड मस्तीच्या ट्रेलरपासून ते प्रसिध्दी कार्यक्रमांपर्यंत हा चित्रपट प्रौढांसाठी आहे आणि चित्रपटाच्या विषयाप्रमाणेच त्यातले विनोद असतील, असे निर्माता अशोक ठकेरिया, दिग्दर्शक इंद्रकुमार या जोडगो3ळीने जाहीर केले होते. तरीही या चित्रपटाला पहिल्याच आठवडय़ात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून ६६.४८ कोटी रुपयांची कमाई करत यावर्षीच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत ‘ग्रँड मस्ती’चे नाव सामील झाले आहे.रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासह सहा अभिनेत्रींची गर्दी असलेल्या या चित्रपटात तडकभडक विनोदी संवाद आणि चित्रण असूनही पहिल्याच दिवशी त्याने १२.५१ कोटी रुपयांची कमाई केली. शनिवार-रविवारी तर हाच आकडा १३.२१ आणि १४.४६ कोटीपर्यंत जाऊन पोहोचला होता. सोमवारपासूनही दरदिवशी या चित्रपटाने पाच कोटींच्या वर कमाई केली असल्याने पहिल्याच आठवडय़ात ‘ग्रँड मस्ती’ला ६६.४८ कोटी रुपयांची कमाई करता आली.
‘ग्रँड मस्ती’च्या या भरघोस प्रतिसादामुळे ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ हा प्रकार आता प्रेक्षकांना आवडू लागला आहे, असा एक नवा निष्कर्ष बॉलिवूडच्या हाती आला आहे. २००४ साली आलेला ‘मस्ती’ हा चित्रपटही लोकांना आवडला होता. पण, ‘ग्रँड मस्ती’च्या तुलनेत मस्ती अगदीच साधा होता, असे म्हणता येईल. एकीकडे बालाजीच्या ‘क्या कूल है हम’ आणि ‘क्या सुपरकूल है हम’ या दोन्ही अ‍ॅडल्ट कॉमेडीपटांना चांगले यश मिळाले होते. त्यामुळे ‘ग्रॅंड मस्ती’ची जाहिरात करतानाच तो अ‍ॅडल्ट कॉमेडी आहे हे ठसवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रसिध्दीची फळे दिग्दर्शक इंद्रकुमार यांना मिळाली असून ‘ग्रँड मस्ती’ अजूनही चित्रपटगृहातून फुल टू मस्तीत सुरू आहे.