News Flash

‘पद्मावती’मधील ‘घुमर…’ गाण्यासाठी साकारली ‘राजेशाही’ प्रतिकृती!

चारशे दिव्यांचा वापर करून सेट प्रकाशमान करण्यात आला होता.

संजय लीला भन्साळींचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘ब्लॅक’, ‘सावरियाँ’, ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ आणि ‘बाजीराव-मस्तानी’सारखे एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटाविषयी चित्रपटरसिकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. एखाद्या सुंदर चित्राप्रमाणे चित्रपटातील दृश्य रुपेरी पडद्यावर साकारणारे भन्साळी ‘लार्जर दॅन लाईफ’ चित्रपटासाठी ओळखले जातात. ‘पद्मावती’साठीदेखील त्यांनी कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. चित्रपटाच्या सेटपासून ते कला-दिग्दर्शनापर्यंत सर्व गोष्टी उत्तम असल्या पाहिजेत यावर त्यांचे बारीक लक्ष असते.

चित्रपटातील ‘घुमर…’ या गाण्यासाठी अलीकडेच त्यांनी चित्तोढगड किल्ल्यातील प्रतिकृतीची निर्मिती केली. चित्रपटाच्या कथेनुसार राजघराण्यात येणाऱ्या प्रत्येक वधुला ‘घुमर’ हे राजनृत्य करावे लागते. या गाण्याचा सेट उभारण्यासाठी जवळजवळ ४० दिवसांचा अवधी लागला. हा सेट उभारण्यासाठी अंदाजे १०० कारागिरांनी मेहनत घेतली. ही प्रतिकृती हुबेहुब किल्ल्यातील अंतर्गत भागाशी मिळतीजुळती आहे. रंग आणि रचना अगदी तंतोतंत असेल याकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले. भिंती सजविण्यासाठी राजस्थानी चित्रांचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर चारशे दिव्यांचा वापर करून सेट प्रकाशमान करण्यात आला होता. आगीवर नृत्य सादर करणाऱ्या नर्तकांना किशनगड येथून बोलावण्यात आले होते. विशेष संगीतकारांना जयपूर येथून पाचारण करून लोकसंगीत तयार करण्यात आले. चित्रपटाची नायिका दीपिका पदुकोणने जवळजवळ दीड महिन्यांच्या कालावधीत हे राजनृत्य शिकले.

संजल लीला भन्साळी त्यांच्या चित्रपटाशी निगडीत छोट्या-छोट्या गोष्टींवरदेखील बारीक लक्ष देऊन असतात हे तर सगळेच जाणतात. ‘घुमर…’ हे चित्रपटातील पहिलेवहिले चित्रित झालेले गाणे असल्याने गाण्यासाठीचा ध्वनी, दृश्यं आणि सेटसह अनेक बारीकसारीक गोष्टींवर संजय लीला भन्साळी जातीने लक्ष ठेवत आहेत. राजेशाही अनुभव देणाऱ्या या गाण्याचा लूकदेखील उत्कृष्ट असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.

संजय लीला भन्साळींचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘वायकॉम 18 मोशन पिक्चर्स’ आणि ‘भन्साली प्रोडक्शन’ची निर्मिती असलेला हा चित्रपट पुढील वर्षी १७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 5:01 pm

Web Title: grandness deepikas ghoomar song padmavati will leave spellbound 400 lamps for a ghoomar
Next Stories
1 ‘मी बिग बॉस १० मध्ये जाणार नाही’
2 आर.जे विद्याची कहानी..
3 बॉलिवूडमध्ये पूर्वीसारखा काळ्या पैशाचा वापर होत नाही: राज्यवर्धन राठोड
Just Now!
X