द्वयर्थी संवाद, कमीत कमी आणि उत्तान कपडे घातलेली नायिका, विचित्रपणे फिरणारा कॅ मेरा आणि या सगळ्याचा आधार घेऊन ओढूनताणून केलेल्या विनोदाची फोडणी म्हणजे ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ असा काहीसा अर्थ याच चित्रपटाच्या आधीच्या भागासाठी शंभर कोटी मिळवणाऱ्या दिग्दर्शक इंद्रकुमारने काढला असावा.. नाही तर ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ हा प्रकार आम्हीच यशस्वी करून दाखवला अशी दर्पोक्ती करणाऱ्या ‘मस्ती’कर्त्यांनी तिसऱ्या सिक्वलमध्ये इतकी वाईट कामगिरी केली नसती.
या चित्रपटात अमर (रितेश देशमुख), प्रेम (आफताब) आणि मीत (विवेक ओबेरॉय) हे तिघेही पुन्हा ‘मस्ती’ बॉइज म्हणून प्रेक्षकांसमोर येतात खरे.. मात्र एकमेव रितेश वगळता अन्य दोघांनीही फिटनेस आणि अभिनयाशी फारकत घेतली असावी, अशी भावना त्यांना पडद्यावर पहिल्याच फ्रेममध्ये होते जी चित्रपटभर कायम राहते. अमरला आपला बंगला विकायचा आहे. त्याच्या घरात त्याची सासू (उषा नाडकर्णी) असल्याने त्याला बायकोपासून दूर राहावे लागते आहे. प्रेमच्या घरी त्याची देखणी मेहुणी बायकोपेक्षा वरचढ ठरत असल्याने त्यालाही वैवाहिक जीवन उपभोगता येत नाही आहे. तर मीतची बायको आणि तिचा पैलवान भाऊ दोघेही जुळे असल्याने बायकोच्या प्रेमळ स्पर्शाऐवजी गुद्देच त्याच्या नशिबात येतात. या तीन वेगवेगळ्या परिस्थितीमुळे लैंगिक सुखाला पारखे असणारे तिन्ही नायक घरात हे सुख मिळत नाही म्हणून बाहेर ते शोधायचे या निर्धाराने दुधवाडीत अमरच्या हवेलीत येऊन पोहोचतात. अमरच्या हवेलीत त्यांची भेट रागिणीशी (ऊर्वशी रौतेला) होते. सुरुवातीला तिला पाहिल्यानंतर प्रेमात पडणारे तिन्ही नायक ती भूत असल्याचे कळल्यानंतर तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र लैंगिक सुखासाठी सुरू केलेल्या खेळात ते तिघेही रागिणीच्या मायाजालात अडकतात. चित्रपटातील इथला काही भाग तुम्हाला थोडाफोर हसवतो, पण एकूणच चित्रपट हा टुकार द्वयर्थी संवाद, त्याच पद्धतीने केलेले बटबटीत चित्रण आणि त्याच्या जोडीला तितकाच भयानक अभिनय याने भरलेला आहे.
‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’च्या नावाखाली प्रेक्षकांच्या माथी काहीही मारले जाऊ शकते आणि त्याला तिकीटबारीवर यशही मिळते, इतक्याच विचाराने जुळवाजुळव करून या ‘ग्रेट ग्रँड वाईट’ पटाची मांडणी करण्यात आली आहे. कथेतच काही नसल्याने तिन्ही नायकांनाही करण्यासारखे काही नाही. तरीही त्यांनी आपापल्या पद्धतीने करता येईल तितके वाईट काम केले आहे. साजिद खानच्या ‘हमशकल’वर झालेल्या टीकेनंतर असे चित्रपट करणार नसल्याचे रितेश देशमुखने म्हटले होते. त्यामुळे ‘व्हिलन’, ‘लय भारी’सारख्या चित्रपटांनंतर ‘ग्रेट ग्रँड मस्ती’मध्ये रितेशला पाहणे हा दु:खदायक प्रकार आहे. विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांनी इतक्या वर्षांनंतर मिळालेल्या चित्रपटाचे सोने करावे तर त्यांनी स्वत:च्या लुकवरही फार मेहनत घेतलेली नाही. तर त्यांच्या कामाबद्दल काय बोलणार? उथळ पाण्याचा खळखळाटच फार.. अशी या चित्रपटाचीच नाही तर एकूणच या ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’पटांची अवस्था झाली आहे.

ग्रेट गॅ्रण्ड मस्ती
निर्माता – समीर नायर, अधिकारी ब्रदर्स
दिग्दर्शक – इंद्र कुमार
कलाकार – रितेश देशमुख, आफताब शिवदासानी, विवेक ओबेरॉय, ऊर्वशी रौतेला, उषा नाडकर्णी.

रेश्मा राईकवार