येत्या १ जुलैपासून देशभरात लागू होणार असलेल्या वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) नवे कर दर शुक्रवारी निश्चित करण्यात आले. वस्तू व सेवा कर परिषदेची दोन दिवसीय बैठक शुक्रवारी समाप्त झाली. शिक्षण व आरोग्य क्षेत्राला करकक्षेतून वगळण्यात आले असून दूरसंचार, विमा, हॉटेल व रेस्टॉरंट्स या सेवा क्षेत्रांसाठी नवे कर दर निश्चित करण्यात आले. जीएसटीमुळे आता मनोरंजनही महागले आहे.

चित्रपटगृहांतील करमणूक कर दर २८ टक्के इतका होणार असल्याने लोकांना आता तिकिटावर अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक, समीक्षक आणि निर्माता धनंजयन यांना तिकीट दरांत वाढ होणार असल्याचे खरे आहे का असे विचारले असता ते म्हणाले, ‘होय, प्रेक्षकांना १२० रुपये तिकिटाचे + २८ टक्के जीसटी याप्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत. यानुसार, आता प्रेक्षकांना तिकिटासाठी १२० रुपयांऐवजी १५३.२० रुपये द्यावे लागतील. हे नवे दर १ जुलैपासून सर्व चित्रपटगृहांना लागू होणार आहेत.’

भारतातील सर्व चित्रपटगृहांना हा नवा कर दर लागू होणार आहे. चित्रपटगृहांतील तिकीट दरांमध्ये काही प्रमाणात फरक राहिला तरी २८ टक्के कर दर हा सर्वांसाठी सारखाच असणार आहे. ‘वस्तू व सेवा कर येत्या १ जुलैपासून देशभर लागू होईल. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या कररचनेमुळे महागाई वाढणार नाही,’ असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.