दूरचित्रवाहिन्यांवरील मराठी मालिकांचे गुढीपाडवा विशेष भाग रविवारी सादर होणार आहेत. ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘देवा शप्पथ’, ‘फुलपाखरु’, ‘बापमाणूस’ आणि ‘कलर्स’ मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाचा समावेश आहे. गुढीपाडव्याचा दिवशी वैदेही समोर असताना अचानक मानसला एक गाणे सुचते. ‘फुलपाखरू’च्या प्रेक्षकांसाठी या नव्या गाण्याची पर्वणी असणार आहे. माया मानसला वैदेहीपासून वेगळे करण्यासाठी तान्या आणि रॉकीला हाताशी धरून नवनवीन चाली खेळत आहे. मानसचे गाणे हे बॅण्डचे गाणे होऊ  शकेल का? या गाण्याने दोस्ती बॅण्ड रॉकीला हरवू शकेल का? वैदेहीने स्वीकारलेले आव्हान ती कितपत पेलू शकेल आणि त्यात यशस्वी होईल का?  याची उत्तरे या महाविशेष भागात मिळणार आहेत. रात्री आठ वाजता ‘झी युवा’वर हा भाग प्रसारित होणार आहे.

देवा शप्पथ

ज्या नारळावरून श्लोकच्या भविष्याची दिशा ठरणार आहे तो नारळ गुढीपाडव्याच्या दिवशी फोडला जाणार आहे. हा नारळ फोडताना कुहू तिथे असायला हवी असे अण्णा महाराजांनी श्लोकच्या वडिलांना सांगितल्यामुळे कुहू गुढीपाडव्याच्या दिवशी दशपुत्रेंच्या घरी जाणार आहे. अण्णा महाराज आणि नारायण यांची भेट होईल का? कुहू आपल्या जोडीदाराबद्दल तिच्या बाबांना खरे काय ते सांगू शकेल का ? तो नारळ फोडल्यानंतर नेमके काय होईल हे ‘देवा शप्पथ’च्या या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  हा विशेष भाग संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणार आहे.

बापमाणूस

मोठय़ा मुलाची अनुपस्थिती वाडय़ातील सर्वांच्या चेहऱ्यावर काळजीच्या रूपात दिसते आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन दादासाहेब सगळ्यांना धीर देत यंदाचा गुढीपाडवा नेहमीच्या उल्हासात साजरा करायला सांगतात. छोटीशी इरा आपल्या वडिलांना म्हणजेच चंद्राला भेटण्याचा हट्ट धरून बसली आहे. दादासाहेब पोलीस निरीक्षक पवार यांची मदत घेऊन पोलीस ठाण्याच्या बाहेर चंद्रा आणि इराची भेट घडवून आणतात. दादासाहेब आणि सूर्याच्या मागे लागलेला कट कारस्थानांचा ससेमिरा मात्र अजूनही कमी होत नाही आहे. चंद्रा आणि इरा भेटल्यानंतर तिथे ठाकूर येतो. सूर्या ठाकूरला घडत असलेली परिस्थिती समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा ठाकूर सूर्याला मारतो.  . सूर्या तिरमिरीत घरी येऊन स्वत:ला खोलीत बंद करून घेतो. ‘बापमाणूस’चा हा विशेष भाग दुपारी दोन आणि रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे.

सूर नवा ध्यास नवा

या विशेष भागामध्ये अनिरुध्द जोशी, श्रीरंग भावे, वैशाली माडे, मधुरा कुंभार, निहिरा, शरयू यांनी सादर केलेली गाणी ऐकायला मिळणार आहेत. भारुड, जागर, पोवाडा, पार्वतीच्या बाळा, कोळी गीत, ललाटी भंडार आणि अन्य गाण्यांचा यात समावेश आहे. या विशेष भागासाठी तेजश्री प्रधान जरीची साडी, गजरा, नथ अशा तर  पुष्कराजही फेटा, धोतर आणि कुर्ता अशा मराठमोळ्या पेहेरावात दिसणार आहेत. सूर नवा ध्यास नवाचा हा विशेष भाग रात्री आठ वाजता सादर होणार आहे.