News Flash

आजोबांच्या भूमिकेतील या अभिनेत्रीला ओळखलंत का?

आजोबांच्या व्यक्तिरेखेसाठी या अभिनेत्रीला मेकअपसाठी पाच तास तर शूटिंगनंतर मेकअप काढण्यासाठी दोन तास लागायचे.

रोहिणी हट्टंगडी

‘Once मोअर’ चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक नरेश बिडकरांचाही स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता… एक विचित्र स्वप्न साकार होत होतं. या चित्रपटात एक विचित्र कॅरेक्टर आहे. एका स्त्रीला पुरुष साकारायचा होता पण ते पडद्यावरचं नाटक नव्हतं तर ती व्यक्तिरेखाच पुरुषाची होती. हे आव्हान होतं आणि ते साकारण्यासाठी कसदार अभिनेत्री हवी होती. मग ‘Once मोअर’च्या टीमकडून एक मुखाने नाव निघालं रोहिणी हट्टंगडी! या फोटोत दिसणारे आजोबा म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आहेत.

१ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘Once मोअर’ या आगामी मराठी चित्रपटासाठी रोहिणीताईंनी हे आजोबांचं पुरुषी रूप धारण केलं आहे. या भूमिकेसाठी रोहिणीताईंनी किती मेहनत घेतली असेल याचा अंदाज फोटोतील गेटअपवरून सहज येतो. ‘Once मोअर’ चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून एकाचवेळी स्त्री व पुरुष अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या सशक्त कलावंताची आवश्यकता होती. या भूमिकेला रोहिणीताई न्याय देऊ शकतील हा विचार करून दिग्दर्शक नरेश बीडकर यांनी रोहिणीताईंना या भूमिकेची आवश्यकता समजावून सांगितली. भूमिकेचं आव्हान व त्यातील वेगळेपणा लक्षात घेत रोहिणीताईंनी या भूमिकेला होकार दिला.

कमल हासन यांना बऱ्याच सिनेमांमध्ये गेटअप करणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट रमेश मोहंती, कमलेश आणि श्रीनिवास मेनगु यांनी ‘Once मोअर’ या चित्रपटासाठी रोहिणीताईंचा मेकअप केला आहे. रमेश आणि कमलेश यांनी प्रॉस्थेटिक मेकअपच्या साहाय्याने रोहिणी यांना आजोबांचं रूप दिलं आहे. या मेकअपसाठी रमेश आणि कमलेश यांच्या जोडीने रोहिणीताईंनीही खूप मेहनत घेतली आहे. चित्रीकरणाच्या पाच तास आधी रोहिणीताईंना मेकअप करण्याची प्रक्रिया सुरू व्हायची. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर दोन तास मेकअप काढण्यासाठी लागायचा. या काळात त्या काहीही खाऊ शकत नव्हत्या.

आजोबांच्या गेटअपमध्ये रोहिणीताईंना केवळ अभिनय, संवादफेक करायची नव्हती, तर त्यात धावण्यापासून अॅक्शन सीन्सपर्यंत बऱ्याच गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे या वयात रोहिणीताईंनी स्वीकारलेलं आजोबांच्या भूमिकेचं आव्हान आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. दिग्दर्शकावर दाखविलेला विश्वासही त्यांच्या भूमिकेला वेगळ्या उंचीवर नेत असल्याचं मत चित्रपटाचे दिग्दर्शक नरेश बिडकर व्यक्त करतात. आजवरच्या करियरमधील ही नावीन्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी ‘Once मोअर’ या सिनेमामुळे मिळाल्याचं सांगत रोहिणीताई म्हणतात की, ‘मला नेहमीच आव्हानं स्वीकारायला आवडतात. हे आव्हान मी स्वीकारणं धाडसाचं होतं पण यातही एक आनंद होता. त्यामुळेच पाच तासांची मेकअप प्रोसेस आणि गेटअपमध्ये अॅक्शन करणं हे देखील मी एन्जॅाय केलं. प्रेक्षकांनाही माझं हे रूप नक्कीच आवडेल’ अशी अपेक्षा रोहिणीताईंनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 3:30 pm

Web Title: guess this actress who will play male character in upcoming marathi movie once more ssv 92
Next Stories
1 हॉट फोटोंवर येणाऱ्या कमेंटविषयी नीना गुप्ता म्हणतात…
2 केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल केल्याप्रकरणी एक जण अटकेत
3 सुष्मिता- रोहमनच्या नात्यात का रे दुरावा ?
Just Now!
X