News Flash

Guilty Movie Review : अन्याय, अत्याचाराविरोधातला हुंकार!

समाजाच्या मानसिकतेवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे

समीर जावळे

Guilty नावाचा एक सिनेमा गेल्याच आठवड्यात Netflix वर रिलिज झाला आहे. #MeToo वर हा सिनेमा भाष्य करतो. एखाद्या स्त्रीवर जेव्हा बलात्कार होतो तेव्हा ती फक्त शरीराने दुखावली जात नाही तर तिला होणाऱ्या वेदना या मानसिकही असतात. समाज अनेकदा गिधाडाच्या नजरेनेच अशा स्त्रीकडे किंवा मुलीकडे पाहात असतो. अशावेळी ‘सेफ’ रहायचं असेल, बेअब्रू होऊ द्यायची नसेल तर गप्प बसणं हाच पर्याय समाज स्त्रीला शिकवतो. अशा समाजाचे आपण घटक आहोत. त्यामुळे हा सिनेमा आपल्यावरही भाष्य करणारा आहे यात शंका नाही. या सिनेमात बलात्कार करणारा जेवढा दोषी आहे तेवढेच समाज म्हणून आपणही दोषी आहोत हे जाणवत राहतं. त्यामुळे सिनेमाला दिलेलं नाव Guilty हे कुणा एकाला लावलेलं विशेषण नसून तो आपल्याला दाखवलेला आरसा आहे हे कळतं. या सिनेमात गुरुफतेह सिंग, कियारा अडवाणी, आकांक्षा रंजन कपूर, दलीप ताहिल, तहेर शब्बीर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

नानकी दत्ता (कियारा अडवाणी) भोवती हा सिनेमा फिरतो. नानकीला विजय प्रताप सिंग नावाचा बॉयफ्रेंड आहे. १४ फेब्रुवारीला असलेल्या एका कॉन्सर्टनंतर विजय प्रताप सिंग अर्थात VJ वर बलात्काराचा आरोप होतो. बलात्काराचा आरोप करणारी मुलगी असते तनू कपूर. विजय दिल्लीतल्या बड्या नेत्याचा मुलगा. तनू कपूर धनबादहून आलेली मुलगी. सगळ्या मित्रांच्या उलट तपासण्या होतात. त्यात दानिश अली बेग (ताहेर शब्बीर) हा वकील महत्त्वाची भूमिका राबवतो. सगळ्या जबान्या व्हिडीओवर रेकॉर्ड केल्या जातात. नानकीला सुरुवातीला वाटत असतं की तनू कपूर (आकांक्षा रंजन कपूर) जाणीवपूर्वक #MeToo चा उल्लेख करते आहे. तनूने केलेल्या ट्विटला हजारो रिट्विट्स मिळतात. एक चळवळ उभी राहते. या प्रकरणाची चर्चा मीडियातही रंगते. त्यानंतर हा खटला कोर्टात उभा राहतो. कोर्टात काय घडतं? तर अपेक्षित गोष्ट… विजय कुमार निर्दोष सुटतो. त्याला दोषी ठरवलं जात नाही. मग पुढे काय घडतं? नानकीला काय वाटतं? ती सत्यापर्यंत पोहचते का? तनू कुमारला न्याय मिळतो का? नानकीच्या बाबतीत काय घडलेलं असतं? या सगळ्यांची उत्तरं सिनेमात आहेत. या सिनेमाचा शेवट तर अगदीच अनपेक्षित असा आहे. सिनेमा या एका वळणावर येऊन संपेल असं वाटत असतानाच तो एक निराळंच वळण घेतो.. तिथे तो संपतो. मात्र मागे अनेक प्रश्न ठेवून जातो. स्त्रीवर, मुलीवर, अल्पवयीन मुलीवर होणारे अत्याचार हे अयोग्यच आहेत. अशावेळी ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणं फक्त बदनामीच्या भीतीने बाहेर येत नाहीत. त्यावरही या सिनेमात प्रभावी भाष्य करण्यात आलं आहे.

 

नानकीच्या भूमिकेत कियारा अडवाणी ज्या प्रकारे वावरली आहे ते सर्वांगसुंदर आहे. अंगावर टॅटू, ड्रग्ज, बॉयफ्रेंडच्या आकंठ प्रेमात बुडालेली नानकी आणि नंतर पेटून उठणारी, चिडणारी, तिच्यासोबत काय घडलं होतं? कुणी केलं होतं हे सगळं खुलेआमपणे सांगणारी नानकी तिने लीलया साकारली आहे. नानकीला पडणारे प्रश्न हे तिच्या वयाच्या, तिच्यापेक्षा कमी वय असलेल्या आणि अगदी वयाने मोठ्या असलेल्या बाईलाही पडले आहेत. मात्र त्यावर भाष्य केलं जात नाही. हा समाज बलात्कार झाल्यानंतर बाईला गप्प बसायला शिकवतो. अन्याय सहन करायला शिकवतो. झालं गेलं ते विसरुन जा नव्याने सुरुवात कर अशी हीन मानसिकता जपतो आणि ती असं करणार नसेल तर तिला सरळ सरळ बाहेरख्याली ठरवलं जातं. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. तीच कशी दोषी आहे ते सांगितलं जातं. या सिनेमात या मुद्द्यांवरही प्रभावीपणे भाष्य करण्यात आलं आहे. व्हॅलेंटाईन डे च्या रात्री घडलेला प्रकार, त्यानंतर होणाऱ्या चर्चा, नानकीची अस्वस्थता, तनू कुमारचं पेटून उठणं सगळं सगळं काही सिनेमात अत्यंत चपखल आणि प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. Rape Capital अशी ओळख असलेल्या दिल्लीतच हा सिनेमा घडतो हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

खटकणाऱ्या गोष्टी

या सिनेमात खटकणाऱ्याही काही गोष्टी आहेत यात मुळीच शंका नाही. नानकी कॉलेजमधला नोटीस बोर्ड वाचत असते तेव्हाच तिचा बॉयफ्रेंड येतो तिला खांद्यावर उचलून घेतो आणि वर्गात नेऊन बसवतो. असं कोणत्या कॉलेजात घडतं? हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. एवढंच नाही तर वर्गातले शिक्षकही नानकीला किंवा VJ ला काहीही बोलत नाहीत. ते फक्त दोघांना जागा बदलण्याचा पर्याय देतात हे देखील पटत नाही.

रुची नारीन या दिग्दर्शिकेने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. स्त्रियांचे प्रश्न या दिग्दर्शिकेने अत्यंत प्रभावीपणे मांडले आहेत. संपूर्ण सिनेमाला एक डार्क शेड आहे. पार्टीतला प्रसंग तर खूपच सुंदर झाला आहे. अत्याचार झाले की स्त्रीला दोषी धरलं जातं. तिला हा समाज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करुन मोकळा होतो असं अनेकदा घडलं आहे. मात्र पुरुष जे वागला आहे ते विसरी पडलं जातं. त्याला बारा खून माफ असतात. समाजाची जडणघडण अशी का? हा प्रश्न न विचारता ही दिग्दर्शिका त्यावर ठामपणे भाष्य करत राहते अनेक प्रसंगातून हा प्रश्न आणि इतर असे प्रश्न विचारत राहते. त्यामुळे हा सिनेमा हा अन्यायाविरोधातला एक हुंकार आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही.

समीर जावळे 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 3:04 pm

Web Title: guilty movie review its a metoo issue cinema scj 81
Next Stories
1 त्या वादानंतर रोहित शेट्टीने कतरिनाला केले अनफॉलो?
2 सुपरहिरो ‘थॉर’ देखील घाबरला करोना वायरसला
3 ‘चला हवा येऊद्या’फेम या अभिनेत्याला ओळखलंत का?
Just Now!
X