डॉ. तात्याराव लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा ‘डॉ. तात्या लहाने.. अंगार पॉवर इज विदीन’ हा सिनेमा ६ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नामवंत कलाकारांचा कसदार अभिनय आणि डॉ. लहाने यांच्या आयुष्याचा आढावा घेण्यासाठी हा सिनेमा प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी आवर्जून पाहण्यासारखा आहे. ‘डॉ. तात्या लहाने … अंगार पॉवर इज विदीन’ सिनेमाचे दिग्दर्शन विराग मधुमालती वानखडे यांनी केले असून त्यांच्याच विराग मधुमालती एण्टरटेनमेंट अंतर्गत सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

‘टॉयलेट- एक प्रेम कथा’साठी अक्षय- रणवीरने केला ‘चीप डान्स’

बहुचर्चित रिले सिंगिंगसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ३२४ गायकांची निवड करण्यात आली आहे. सात ते सत्तर वयोमर्यादा असलेले गायक रिले सिंगिंगसाठी सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरचे आमदार सुजित मिंचेकर यांचादेखील सहभाग या ३२४ गायकांमध्ये असणार आहेत. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या ऑडिटोरियममध्ये १६ ऑगस्ट रोजी रिले सिंगिंगच्या रेकॉर्डची नोंद घेण्यासाठी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे पदाधिकारी येणार आहेत. या विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

विराग यांनी लिहिलेलं ‘काळोखाला भेदून टाकू…जीवनाला उजळून टाकू!’ हे १०८ शब्दांचं गाणं तब्बल ३२४ गायक गाणार असून सलग ३ वेळा सूर, ताल आणि लय यांची सुसूत्रता ठेवत एक शब्द एक गायक या पद्धतीने हे गाणे सादर होणार आहे आणि त्यामुळेच हा प्रयोग नेमका कसा यशस्वी होईल याबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

रिले सिंगिंगसाठी संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या ऑडिशन्समध्ये मुंबई/ठाणे(१२५), पुणे (१८), नाशिक(१२), सांगली(७), धुळे(२०), जळगाव(३०), जालना(६), अकोला(११), अमरावती(१७), नागपूर(११), वाशिम(१५), लातूर(१६), परळी(२), कोल्हापूर(८) सोलापूर (३) मधून ३२४ उत्तम गायक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. डॉ. लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी सादर करण्यात येणारे रिले सिंगिंग भारतीय सिनेसृष्टीत पहिल्यांदा होत असल्याने हा क्षण अनुभवणं औत्सुक्याचं ठरणारं आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे आणि अलका कुबल यांच्यासोबत सिनेमात निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे, रमेश देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सिनेमाची कथा-पटकथा- संवाद विराग यांनी स्वतः लिहिले असून सिनेमाचं संगीत ‘एक हिंदुस्थानी’ या संगीतकाराने केलं आहे. डॉ. लहाने यांच्यासारखं निस्वार्थ समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ‘एक हिंदुस्थानीने’ प्रसिद्धी पासून लांब राहण्याचे पसंत केले आहे. निर्माता-दिग्दर्शक विराग यांच्या कठोर परिश्रमातून साकारला जाणारा हा सिनेमा ६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.