देखणे व्यक्तिमत्त्व, हसरा आणि प्रसन्न चेहरा लाभलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे खरे नाव रवींद्र अनंत कृष्णा राव. चित्रपटासाठी त्यांचे ‘रविराज’ असे नामकरण झाले आणि आज ते याच नावाने ओळखले जातात. मराठी, हिंदूी, गुजराथी चित्रपट आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीवर २५ वर्षांहून अधिक काळ काम केलेले पण आता रुपेरी दुनिया आणि झगमगटापासून पूर्णपणे दूर गेलेले अभिनेते रविराज आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.. 

रविराज यांचा जन्म मंगलोरचा. ते नऊ महिन्यांचे असताना त्यांचे वडील अनंत कृष्णा राव हे नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आले आणि रविराज मुंबईकरच झाले. रविराज या नावावरून किंवा त्यांच्या बोलण्यावरून ते अमराठी आहेत, असे अजिबात वाटत नाही. कानडी भाषिक असलेल्या रविराज यांचे  शालेय शिक्षण मुंबईतच ‘डीजीटी’ अर्थात ‘धरमसी गोविंदजी ठाकरसी’ या मराठी शाळेत तर इंटपर्यंतचे शिक्षण के. सी. महाविद्यालयात, विज्ञान शाखेतील ‘बीएस्सी’पर्यंतचे पुढील शिक्षण रुपारेल महाविद्यालयात झाले. शाळेत असताना इयत्ता नववीच्या स्नेहसंमेलनात त्यांनी एका नाटकात काम केले होते. खरे तर इंटरनंतर त्यांना पुण्याच्या ‘फिल्म अ‍ॅण्ड  टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’ (एफटीआय) मध्ये प्रवेश घ्यायचा होता. पण घरच्यांना ते पसंत नव्हते. पदवीधर हो, नोकरी कर आणि सुरक्षित आयुष्य जग, अशी एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी तो विचार सोडून दिला आणि पुढे शिकायचे ठरविले. शिक्षण पूर्ण झाले आणि लगेचच त्यांना ‘प्रॉडक्शन केमिस्ट’ म्हणून जे. एन. मॉरिसन (आताची निव्हिया कंपनी)  कंपनीत नोकरीही मिळाली. १९६६ ते १९७० या कालावधीत ते येथे नोकरी करत होते. पुढे ती कंपनी मुंबईतून बंगलोरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणतीही अगदी एक रुपयाही पगारवाढ मिळणार नव्हती. त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. आता पूर्णपणे मोकळे झाल्याने चित्रपटात जायच्या त्यांच्या इच्छेने पुन्हा उचल खाल् ली आणि पुढचे काही महिने त्यांचा संघर्ष सुरू झाला.

vasai suicide marathi news
वसई: चित्रफित तयार करून तरुणाची आत्महत्या, पोलिसाने धमकी दिल्याचा चित्रफितीत आरोप
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष

चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावरच्या प्रवेशाविषयी ते म्हणाले, ती एक गंमत आणि योगायोगच आहे. आम्ही राहात होतो त्या ठिकाणी गटार तुंबले होते. सर्वत्र घाण पाणी पसरलेले असायचे. दरुगधी यायची. मुंबई महापालिकेत तक्रार अर्ज देऊन, तिथे जाऊन, वारंवार खेपा घालूनही ते गटार काही दुरुस्त होत नव्हते. एके दिवशी रागारागाने मी आमचे स्थानिक नगरसेवक प्रभाकर निखलणकर यांच्या घरी गेलो आणि रागाच्या भरात त्यांना हे सगळे सांगितले. त्यांनी सर्व शांतपणे ऐकून घेतले आणि हे काम होईल असे सांगितले. खरी गंमत तर पुढेच आहे. निखलणकर यांनी मला ‘सध्या काय करताय?,’ असा प्रश्न केला. त्यावर मी नोकरीचा राजीनामा दिला असून सिनेमात काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी मला गाडीत बसायला सांगितले आणि संगीतकार व ‘शुरा मी वंदिले’ या चित्रपटाचे निर्माते श्रीकांत ठाकरे यांच्या घरी घेऊन गेले. निखलणकरही त्या चित्रपटाचे एक निर्माते होते. आपण चित्रपट करतोय आणि त्या चित्रपटात याला हिरो म्हणून घेतोय असे त्यांनी ठाकरे यांना सांगितले. सरला येवलेकर त्यात माझी नायिका होती. खरे तर चित्रपटात माझी भूमिका खलनायकाची. पण तो चित्रपटातील शेवटचा धक्का होता. चित्रपटात मला ‘अरे दु:खी जीवा बेकरार होऊ नको’ हे गाणे होते. मोहंमद रफी यांनी चित्रपटासाठी पाश्र्वगायन केलेले ते पहिले मराठी गाणे.

खरे तर ‘आहट’ हा हिंदीतील माझा पहिला चित्रपट. पण काही र्वषाच्या खंडांनतर रेंगाळलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला. दरम्यान, मी काम केलेला गुलजार यांचा ‘अचानक’ हा हिंदी आणि राजा ठाकूर दिग्दर्शित ‘जावई विकत घेणे आहे’ हे चित्रपट ‘आहट’च्या आधी प्रदर्शित झाले. ‘आहट’मध्ये विनोद मेहरा, जया भादुरी,अमरीश पुरी, डॉ. श्रीराम लागू, रमेश देव, सतीश दुभाषी (जया भादुरीच्या वडिलांची भूमिका), धर्मेंद्र पाहुणा कलाकार अशी मंडळी होती. रमेश देव, डॉ. लागू आणि अमरिश पुरी हे तिघेही त्यात खलनायक होते. चित्रपटाचे निर्माते किशोर रेगे यांच्यामुळे ‘आहट’ मला मिळाला. तो चित्रपट वेळच्या वेळी तयार होऊन प्रदर्शित झाला असता तर कदाचित हिंदीतही मी पुढे आलो असतो. पण ते झाले नाही, अशी खंतही रविराज यांनी व्यक्त केली.

१९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जावई विकत घेणे आहे’चे दिग्दर्शन राजा ठाकूर यांचे होते. एक दिवस त्यांनी रविराज यांना भेटायला बोलाविले आणि ‘जावई विकत घेणे आहे’ साठी त्यांची नायक म्हणून निवड झाली. गणेश सोळंकी, शरद तळवलकर, मधुकर तोरमडल, राजा बापाट, रुही आदी कलाकार त्यात होते. हा चित्रपट गाजला आणि त्यातील रविराज आणि रुही यांच्यावर चित्रित झालेले ‘या मिलनी रात्र ही रंगली’ हे गाणे लोकप्रिय झाले. या चित्रपटाने रविराज यांना नाव आणि प्रसिद्धी मिळाली. नंतर रविराज यांनी ‘ओवाळिते भाऊराया’, ‘तूच माझी    राणी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘देवापुढे माणूस’, ‘अजातशत्रू’, ‘दोस्त असावा तर असा’, ‘जावयाची जात’, ‘नणंद भावजय’, ‘भन्नाट भानू’ आदी मराठी चित्रपट केले. ‘ओवाळिते भाऊराया’मधील ‘बाजार फुलांचा भरला, मज तुळस दिसेना, मज  बहीण दिसेना’, ‘दोस्त असावा तर असा’ चित्रपटातील ‘जे जे सुंदर ते माझे घर मी तर आहे मस्त कलंदर’, ‘जावयाची जात’मधील ‘प्रिया सखी चंद्रमुखी जवळ ये जरा, माझ्या प्रितपाखरा’ ही त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी गाजली. ‘अन्यायाचा प्रतिकार’ हा त्यांनी काम केलेला शेवटचा मराठी चित्रपट. रविराज यांनी ‘अचानक’, तीन चेहरे’, ‘एक चिठ्ठी प्यार भरी’, ‘चांद का टुकडा’ आणि गाजलेल्या ‘खट्टा मिठा’ या हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या. यातील ‘थोडा  है थोडे की जरुरत है’ आणि  ‘रोल गोल माकुनिसा’ ही गाणी गाजली. ‘मेघनी रात’, ‘गाजर नी पिपुडी’, जे पीड परायी जानी रे’ आदी गुजराती चित्रपटही त्यांच्या नावावर जमा आहेत.

मधुसुदन कोल्हटकर यांचे ‘शबरी’ हे त्यांनी काम केलेले पहिले मराठी व्यावसायिक नाटक. त्यानंतर ‘डार्लिग डार्लिग’ यासह मधुसुदन कालेलकर यांची ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ ही नाटके तसेच ‘हिट अ‍ॅण्ड हॉट’च्या जमान्यात ‘बदफैली’,  ‘डाग’, ‘सेक्सी’ अशी नाटकेही केली. या सर्व नाटकांच्या त्यांनी केलेल्या एकूण प्रयोगांची संख्या तीन हजार इतकी आहे. रामानंद सागर यांच्या ‘श्रीकृष्ण’ मालिकेत त्यांनी ‘गर्ग’ मुनी साकारले होते. ‘अदालत’, ‘एअर होस्टेस’, ‘शिव पुराण’आदी हिंदी मालिकांमधूनही त्यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली.

देखणे व्यक्तिमत्त्व, प्रसन्न आणि हसरा चेहरा असलेला हा अभिनेता सध्या रुपेरी दुनिया आणि मायावी झगमगटापासून पूर्णपणे दूर गेला आहे. इतकी वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात काम करूनही वयाच्या ७३ व्या वर्षी हा कलाकार भाडय़ाच्या घरात राहतो आहे. कलाकारांच्या राखीव कोटय़ातून घर मिळविण्यासाठी त्यांनी १९८१ पासून प्रयत्न केले. संबंधितांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या, निवेदने दिली पण आश्वासनांखेरीज हातात काहीही मिळाले नसल्याची खंत त्यांना आहे. या क्षेत्रातील काही कडू अनुभवांमुळे त्यांनी या क्षेत्राकडेच पाठ फिरविली. कोणतेही सोहळे, पुरस्कार वितरण समारंभ याचेही त्यांना बोलावणे नसते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ते सदस्य आहेत. पण आता ते कुठेच दिसत नाहीत.

इतकी वर्षे या क्षेत्रात काम केल्यानंतर पुन्हा एकदा अभिनय करायची इच्छा त्यांना होते. पण जे पटणार नाही ते न करणे, स्वभावातील स्पष्टवक्ते पणा आणि ‘काम द्या’ म्हणून कोणाच्या मागे न लागणे यामुळे तशी संधी त्यांना मिळालेली नाही. पण आजवरच्या अनुभवाचा आणि वयाचा मान राखून चांगली भूमिका मिळाली तर आजही काम करायची त्यांची इच्छा व तयारी आहे. रुपेरी दुनियेपासून पूर्णपणे दूर गेलो असलो तरी आजही कुठेही लोक भेटले की ते मला ओळखतात. जुन्या चित्रपटांची आठवण काढतात. माझ्यासाठी तीच समाधानाची आणि आनंदाची बाब असल्याचे रविराज सांगतात. पत्नी उषा आणि प्रितेश हा मुलगा व पूजश्री ही मुलगी असा त्यांचा परिवार. सकाळी जमेल आणि झेपेल तसा दररोजचा व्यायाम, आध्यात्मिक पुस्तकांचे वाचन आणि निर्मलादेवी यांनी सांगितलेला ‘सहजसमाधी योग’ (ध्यानधारणा) करणे, समवयस्क मित्रांबरोबर गप्पा व भेटीगाठी हा त्यांचा सध्याचा विरंगुळा आहे.

वयोपरत्वे माणसांचे जे काही हाल होतात ते त्यांना पाहावत नाहीत. ती बाब त्यांना सतत अस्वस्थ करते. त्यामुळेच पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात त्यांना अडकायचे नाहीये. श्रीमद् भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमची सुटका होऊन मोक्ष मिळावा, अशी माझी परमेश्वराकडे इच्छा असल्याचे सांगत त्यांनी गप्पांचा समारोप केला.
शेखर जोशी Shekhar.joshi@expressindia.com